महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर

महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय भूकंप; काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या वाटेवर

महाराष्ट्राच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप आला होता. शिवसेना आणि अपक्ष अशा ५० आमदारांच्या उठावानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिवसेना- भाजपा यांची सत्ता आली. आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातही मोठा राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे.

काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून काँग्रेसचे ११ पैकी १० आमदार विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. भाजपा श्रेष्ठींकडूनही यासाठी हिरवा कंदील मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

गोव्यात काँग्रेस विधिमंडळ गटात मोठी फूट पडली असून लवकरच दहा आमदारांचा गट भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सोमवार ११ जुलैपासून सुरू होणार आहे. या दरम्यान आता गोव्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडु राव यांनी या घडामोडींचा आढावा घेतला असून त्यांनी आमदारांचं मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्ष नेते मायकल लोबो यांच्यासह अन्य नऊ काँग्रेस आमदार असे एकूण दहा जणांचा गट भाजपात विलीन करण्याबाबत ठाम असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

‘आरे आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी लहान मुलांचा वापर केला’

जोकोविचने विम्बल्डन जेतेपदावर सातव्यांदा कोरलं नाव!

‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’

जोहान्सबर्गमध्ये झालेल्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू

दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी सोमवारपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनाची रणनीती आखण्यासाठी शनिवारी आमदारांची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये पार्टीचे सर्व ११ आमदार सहभागी होते. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं आपल्या उमेदवारांना वेगवेगळ्या धार्मिक स्थळी नेऊन पक्षनिष्ठेची शपथ दिली होती. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुढे काय होणार याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version