लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करुन राज्यात १ हजार कोटींचा वाईन स्कॅम झाल्याचा आरोप केला आहे. यात संजय राऊत यांच्या कन्येचे नावही समोर आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र राज्यात वाईन धोरण राबवून १००० कोटींचा स्कॅम करण्यात आल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी संजय राऊत यांची कन्या वाईन कंपनीच्या संचालकपदी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांच्या कन्या वाईन किंग अशोक गर्ग यांच्या मॅग्पी DFS Pvt Ltd या कंपनीच्या संचालक झाल्या. तर, २६ एप्रिल २०२१ रोजी राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील वाईन धोरणात सुधारणा करून वाईनला मद्यविरहित मानून किरकोळ दुकाने, सुपर मार्केटमध्ये विक्री करण्यास परवानगी दिली होती. हा तब्बल १००० कोटींचा वाईन घोटाळा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भातील काही कागदपत्रेही शेअर केली आहेत. त्यामध्ये, राऊत यांची कन्या पूर्वशी संजय राऊत यांचं नाव आहे.
Sanjay Raut Wine Scam
Sanjay Raut Daughters became Directors in Wine King Ashok Garg Magpie DFS Pvt Ltd on 16/4/2021 on 26/4/21 Thackeray Sarkar amended Wine Policy of Maharashtra to Treat Wine as Non Alcoholic & allow Sale in Retail Shops, Super Market. ₹1000 Crore Wine Scam pic.twitter.com/LkwyfGeIer
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) March 27, 2024
“एप्रिल २०२१ मध्ये केजरीवाल यांच्या “आप” सरकारच्या दिल्ली दारू घोटाळ्याप्रमाणे, संजय राऊत यांनी ठाकरे सरकारच्या पाठिंब्याने “महाराष्ट्राचा वाईन घोटाळा” केला, असे सोमय्या यांच्या कार्यालयातून केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
“एप्रिल २०२१ मध्ये वाईन डीलर्स असोसिएशनने ठाकरे सरकारसमोर महाराष्ट्र सरकारच्या वाईन धोरणात बदल करण्याची मागणी केली होती. याचे सादरीकरण २६ एप्रिल २०२१ रोजी करण्यात आले होते. त्याच वेळी १६ एप्रिल २०२१ रोजी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या कुटुंबाने/मित्राने महाराष्ट्रातील वाईन किंग अशोक गर्ग यांच्यासोबत भागीदारी करार केला. १६ एप्रिल २०२१ रोजी संजय राऊत यांच्या मुली, उर्वशी आणि विदिता यांना अशोक गर्ग यांच्या मॅग्पी DFS Pvt Ltd मध्ये भागीदार सुजित पाटकर यांच्यासोबत संचालक करण्यात आले.”
हे ही वाचा:
वंचितचा महाविकास आघाडीला डच्चू; ‘एकला चलो’चा नारा देत उमेदवार घोषित
ठाकरे गटाचे लोकसभा उमेदवार अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे वयाच्या ९४व्या वर्षी निधन
“संजय राऊत किंवा त्यांच्या कुटुंबाला या व्यवसायाचा कोणताही अनुभव नाही तरीही कथित वाईन किंग अशोक गर्ग यांनी त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये भागीदार बनवले होते,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वीच पत्रा चाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर, ईडीकडून त्यांना अटकही करण्यात आली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत.