समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप….आमदारकी जाणार?

समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप….आमदारकी जाणार?

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते. ११ जानेवारी रोजी एका महिलेने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यामुळे राज्यात खळबळ माजली होती.

रेणू शर्मा या महिलेने ११ जानेवारी रोजी ट्विट करत धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. “मी धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे पण त्यावर अजून काहीही कार्यवाही झालेली नाही” असे या ट्विट मध्ये म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी लग्नाची आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार शर्मा यांनी केली आहे.

धंनजय मुंडे यांनी फेसबूक पोस्टच्या माध्यमातून या आरोपांना उत्तर दिले आहे. रेणू शर्माच्या आरोपांचे खंडन करताना आपण रेणू यांच्या मोठ्या बहिणी सोबत परस्पर सहमतीने संबंधात होतो आणि या संबंधातून आपल्याला दोन अपत्य असल्याचा धक्कादायक खुलासाही मुंडे यांनी केला आहे. पण आता या खुलास्यामुळेच धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंडे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये आपल्या दोन अपत्यांचा आणि त्यांच्या नावावर घेतलेल्या मालमत्तेचा उल्लेख केला आहे. पण त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात ही गोष्ट जाहीर केलेली नाही. त्यामुळे मुंडे यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते.

भाजपा नेत्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
धनंजय मुंडे यांच्या खुलास्यानंतर भाजपा नेते मुंडेंविरोधात आक्रमक झाले आहेत. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक अयोगाला पत्र लिहिले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात महत्वाची माहिती लपवल्याबद्दल मुंडेंची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी या पत्रांद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version