लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जात आहे. राज्यात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अद्याप धुसपूस चाललेली असताना महायुतीमध्ये मात्र जागावाटपाचा तिढा सुटल्याचे चित्र आहे. भाजपा, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीसोबत जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. मात्र, त्यांचा मतदारसंघ कोणता असणार यावरून संभ्रम होता. अखेर, आज महादेव जानकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. महायुतीच्या जागावाटपात परभणीची जागा राष्ट्रवादीला मिळाली होती. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुतीचं व्यापक हित लक्षात घेत आम्ही ही जागा महादेव जानकर यांना देण्याचा निर्णय घेतला असून तेच या मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील, अशी माहिती सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
“राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी यापूर्वीच रायगडमधून माझी आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीत आम्हाला सात ते आठ जागा मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे. मात्र इतर जागांबाबत अद्याप चर्चा सुरू आहे. परभणीची जागाही आम्हाला सोडण्यात आली होती. परंतु महादेव जानकर यांचं गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात मोठं राजकीय आणि सामाजिक काम आहे. त्यामुळे आम्ही परभणीची जागा त्यांना देण्याचा निर्यण घेतला आहे,” असं सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे.
हे ही वाचा :
इंजिनीअरच्या हत्येनंतर चीनने थांबवले पाकिस्तानमधील धरणाचे बांधकाम
इस्रायलला दोन हजारांहून अधिक बॉम्ब, २५ एफ-३५ लढाऊ विमाने देण्यास अमेरिकेची मंजुरी
डेव्हिड विलीने लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडली; मॅट हेन्रीची एण्ट्री
विराट कोहलीची रिंकू सिंगला बॅट भेट
परभणी लोकसभा मतदारसंघ रासपला सोडल्याबद्दल महादेव जानकर यांनी महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. आभार मानताना त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे या सर्वांचा मी ऋणी आहे. परभणीत ठाकरे गटाचे संजय जाधव खासदार आहेत. त्यामुळे महादेव जानकर विरुद्ध ठाकरे गट अशी लढाई होणार आहे. परभणीची जागा रासपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून देण्यात आली आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत ही जागा जानकर यांना देण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासून कामाला सुरुवात करत प्रचारात आघाडी घेतली आहे. आधी जानकर माढ्यातून शरद पवार गटातून लढणार अशी चर्चा होती. त्यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. मात्र, नंतर ते महायुतीत गेले.