बाळासाहेबांचा फोटो वापरून शिवसेनेची खंडणीखोरी?

बाळासाहेबांचा फोटो वापरून शिवसेनेची खंडणीखोरी?

शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी गोळा करत असल्याचा खळबळजनक आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. “विरप्पन गँगचा एन्काऊंटर करणार’ हे माझे ट्विट अनेक शिवसेना नेत्यांना झोंबले होते. मी आज पुरावे घेवून आलोय की विरप्पन गँग कशी खंडणी वसूल करते.” असं सांगत भर पत्रकार परिषदेत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेकडून फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या पावत्या मांडल्या.

“शिवसेनेने हॉकर्स झोनची घोषणा केली होती मात्र हॉकर्स झोन झाले नाही. आता शिवसेना फेरीवाल्यांकडून रीतसर पावती देवून खंडणी वसूल करते. या पावतीवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. तसंच सार्वजनिक पथ आणि पद वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा होणारा उपद्रव कमी करण्यासाठी आणि कचरा निर्मुलनासाठी घेण्यात येणारा आकार असं या पावतीवर लिहिण्यात आलं आहे”, असे देशपांडे यांनी सांगितले.

“फेरीवाल्यांना स्पष्टपणे सांगितलंय जातंय तुम्ही आम्हाला पैसे द्या. महानगरपालिका तुमच्या स्टॉलला हात लावणार नाही. पोलिसांना आम्ही मॅनेज करु बाळासाहेबांचा, मुख्यमंत्र्यांचा, पर्यावरण मंत्र्यांचा फोटो पावतीवर लावून वसुली केली जातीय. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे”, असं म्हणत असताना संदीप देशपांडे यांच्याा डोळ्यात पाणी आलं.

मुंबई महानगर पालिकेमध्ये गेली २९ वर्ष शिवसेनेची सत्ता आहे.

Exit mobile version