राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ ही घोषणा दिली. पुढे भाजपाकडून ही घोषणा लावून धरण्यात आली. या घोषणेवरून विरोधकांनी भाजपावर टीकाही केली. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “समाजाला वाटण्याचे काम काँग्रेस आणि महाविकास आघाडीने केले आहे. त्यामुळे ही निवडणूक एक प्रकारचं युद्धच आहे. भारताचा इतिहास पाहिल्यास जेव्हा, जेव्हा देश जाती आणि प्रांतात वाटला गेला तेव्हा- तेव्हा देशाचे तुकडे झाले. हा देश जेव्हा जातींमध्ये विभागला गेला, राज्यांमध्ये विभागला गेला, समाजात विभागला गेला तेव्हा आम्ही गुलाम झालो. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास राहिला आहे. त्याचीच आठवण योगी आदित्यनाथ यांनी करुन दिली. या घोषणेत काहीच चुकीचे नाही,” असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी या घोषणेला पाठींबा दिला नसल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हे लोक या घोषणेचा अर्थ समजू शकले नाहीयेत किंवा बोलताना त्यांना वेगळे काही सांगायचे आहे आणि ते वेगळे काही सांगून गेले. अजित पवार यांचा विचार केला तर ते आतापर्यंत हिंदू विरोधी असलेल्या विचारात राहिले. त्यांची धर्मनिरपक्षेतेची व्याख्या हिंदू विरोध म्हणजे धर्मनिरपक्षेता होती. त्यांना जनतेचे कल समजून घेण्यास थोडा वेळ लागणार आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे आहे. त्यात काहीच चुकीचे नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
हे ही वाचा:
दिल्लीत प्रदूषण वाढले; पाचवी पर्यंतच्या शाळा ऑनलाईन भरणार
हिंदुत्ववादी मते फुटू नयेत म्हणून उबाठा गटातून माघार घेणारे तनवाणी शिंदे गटात
मालेगावात १२५ कोटींचे इंधन आले कुठून?
भास्कर जाधव म्हणाले, काँग्रेसचे सुनील केदार म्हणजे मारुतीच्या बेंबीतला विंचू!
“काँग्रेस आणि महाविकास आघाडी समाजाला वाटत आहे. त्यामुळे ‘एक है तो सेफ’ हा मोदींचा महामंत्र आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो’ हा त्यांच्या हातातील लाल संविधानाप्रमाणे आहे. त्या लाल संविधानाला वरती कव्हर होते आणि आतमध्ये कोरे कागद होते. सर्व माध्यमांनी ते दाखवले. त्यानंतर त्यांनीही हे मान्य केले. त्यांचा भारत जोडो असेच आहे म्हणजेच सर्व संघटना तोडणे असा आहे. राहुल गांधी यांच्या मानसिकतेचे संकेत त्यांनी अमेरिकेत दिले आहेत. राहुल गांधींनी चूक केली आहे. त्यांना माहित नव्हते की, मीडिया सर्वत्र त्यांचा पाठलाग करतो. त्यामुळे जेव्हा त्यांनी अमेरिकेत जाऊन संविधान आणि आरक्षणावर विधाने केली होती. त्यांची मानसिकता उघड झाली होती,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.