दिल्लीत लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षानेही (आप) जोरदार तयारी सुरू केली आहे. अशातच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. आम्ही स्वबळावर निवडणुका लढवू, असे रविवार, १ डिसेंबर रोजी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे दिल्लीत ‘इंडी’ आघाडीला त्यांनी दणका देत एकला चलो रेचा नारा दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील विधानसभा निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही कोणतीही आघाडी करणार नाही. दिल्लीतील सर्व जागांवर आप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. आता केजरीवाल यांनी स्वबळावर निवडणुका लढविण्याची घोषणा केल्याने इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. २०२४ लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांनी पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती नाकारली होती. तसेच हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपची आघाडी झाली नव्हती.
दिल्ली विधानसभेतील एकुण ७० जागांपैकी ६२ आमदार आम आदमी पार्टीचे आहेत. सत्ताधारी आपने अलीकडेच ११ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे. यामध्ये भाजप आणि काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या सहा नेत्यांचा समावेश आहे.
हे ही वाचा..
सिब्बल, पित्रोडांसोबत दिसलेला शुजा पुन्हा ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करतोय!
कॅनडातील खलिस्तानींची नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी
आता बदायूँमधील जामा मशिद म्हणजे नीळकंठ महादेव मंदिर!
आंध्र प्रदेश सरकारकडून वक्फ बोर्ड बरखास्त
दरम्यान, फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत चौथ्यांदा आप दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, भाजप आणि काँग्रेसचीही तयारी सुरू आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागा आपने जिंकल्या होत्या. तर आठ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते.