तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हे दिल्लीतील रामलीला मैदानात त्यांचा पक्ष इंडिया आघाडीसोबत असल्याची ग्वाही देत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मात्र वेगळा राग आळवत आहेत. आमचा पक्ष काँग्रेसविरुद्ध लढत असल्याचे सांगत बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि माकपवर भाजपला मदत केली जात असल्याचा आरोप केला. काँग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला मत देणे आहे, अशी टीका त्यांनी केली.
‘काँग्रेस पक्ष येथे डाव्यांशी आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. त्यांना मत देणे म्हणजे भाजपला मत देण्यासारखे आहे. आमचा पक्ष माकप-भाजप-काँग्रेसविरोधात एकट्याने लढा देत आहे. मी असे ऐकले आहे की माकप आणि काँग्रेस इंडिया आघाडीतून लढा देत आहे. अशी कोणतीही आघाडी स्थापन झालेली नाही. येथे घोटाळा झाला आहे. माकप-भाजप-काँग्रेस एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला तृणमूल’ असे बॅनर्जी म्हणाल्या.
‘तुम्हाला बिल्कीस बानो माहिती आहे का? तुम्हाला हाथरस घटना आठवते का? तुम्हाला गुजरातची दंगल आठवते का? भाजप हा दंगलखोर पक्ष आहे आणि काँग्रेस व माकप त्यांना पाठिंबा देत आहे,’ असा आरोप त्यांनी केला.
तृणमूलचे नेते कुणाल घोष यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले. राष्ट्रीय स्तरावर आम्ही इंडिया आघाडीच्या पाठिशी आहोत. परंतु बंगालमध्ये काँग्रेस आणि माकप हे भाजपला आघाडी देत आहेत, असा दावा त्यांनी केला.
ही वाचा :
गडचिरोली पोलिसांची कारवाई; महाराष्ट्र- छत्तीसगड सीमेवरील माओवादी कॅम्प उद्ध्वस्त
अरविंद केजरीवालांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार
काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा
‘इंडिया आघाडी ही आमच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्याच पुढाकाराने अस्तित्वात आली आहे. हे नावही आमच्या मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आम्ही राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडीसोबतच आहोत. मात्र पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि माकप हे भाजपचे एजंट बनले आहेत. भाजपविरोधात लढण्यासाठी त्यांच्याकडे पक्षसंघटन नाही, मतार ते तृणमूलविरोधात राजकारण करून भाजपला मदत करत आहेत. त्यामुळेच तृणमूल काँग्रेस बंगालमध्ये भाजपविरोधातील सर्व ४२ जागा लढवत आहे,’ असे घोष यांनी स्पष्ट केले.