लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच पक्षांनी आता कंबर कसली आहे. एकीकडे महायुतीकडून जागा वाटपावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरून बिघाडी झाल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच वंचित बहुजन आघाडीकडून वारंवार जाग वाटपावर होत असणारे वाद चव्हाट्यावर आणले जात आहेत. अशातच महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
प्रकाश आंबेडकर सोबत आले तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरल्या आहेत. तर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे मंगळवार, १९ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजेपर्यंत काय तो निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढू, असा अल्टिमेटम आता महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना दिल्याची माहिती समोर येत आहे. प्रकाश आंबेडकर हे जागा वाटपाचा मुद्दा ताणून धरत असल्याने हा अल्टिमेटम देण्यात आल्याची चर्चा आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला २२-१६-१० असा राहणार आहे. त्यानुसार ठाकरे गट २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागांवर लढण्याची शक्यता आहे.
शिवाय, वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, २०-१५-९-४ हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहणार आहे. त्या परिस्थितीत ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ९ आणि वंचितला ४ जागा देण्यात येतील. वंचितला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे.
हे ही वाचा:
मनसे होणार भाजपात सामील, राज ठाकरे दिल्लीला रवाना!
“आयपीएलच्या आगामी हंगामात रोहित शर्मासोबत खेळण्यास उत्सुक”
“इंडी आघाडीतील नेत्यांची सभा म्हणजे ‘फॅमिली’ गॅदरिंग”
रमझानच्या दिवशी दुकान उघडे ठेवले म्हणून बांगलादेशात हिंदू व्यक्तीला मारहाण
चार जागांचा वंचितला प्रस्ताव
महाविकास आघाडीने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. मात्र, त्या जागा अमान्य असल्याचे वंचितने स्पष्ट केले होते. पडणाऱ्या जागा वंचितला दिल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीवर निशाणा देखील साधला होता.