कथित मद्य घोटाळाप्रकरणात ईडीने कारवाई करून अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडी संपली. त्यामुळे केजरीवाल यांना पुन्हा राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावली आहे. ईडीने न्यायालयीन कोठडी मागितल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला. त्यामुळे आता १५ एप्रिलपर्यंत ते तिहार जेलमध्ये असणार आहेत.
राऊज एव्हेन्यू न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश (पीसी ॲक्ट) कावेरी बावेजा यांनी हे निर्देश दिले आहेत. मद्य विक्री धोरण प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची २८ मार्चला चार दिवसांची ईडी कोठडी वाढवली होती. केजरीवाल यांना २१ मार्चला अटक करण्यात आली होती. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांना ईडीने २२ मार्चला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना सहा दिवसांसाठी ईडी कोठडीत पाठवलं होतं.
अरविंद केजरीवाल यांच्यावरील सुनावणीवेळी न्यायालयाने ‘ईडी’ला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्याच्या अधिकारक्षेत्रावर भाष्य केलेले नाही, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यावेळी ईडीने केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
हे ही वाचा :
ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींना ‘भारतरत्न’ पुरस्कार
काँग्रेसने भारताचे बेट श्रीलंकेला देऊन टाकले; पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्याला मारहाण; ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
बारामतीमधून सुप्रिया सुळे तर शिरूर मधून अमोल कोल्हे लोकसभेच्या रिंगणात
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क धोरण २०२१-२२ मधील कथित घोटाळ्यात ईडी मनी लाँड्रिंगचा तपास करत आहे. जुलै २०२२ मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना अहवाल सादर केला होता. यामध्ये अबकारी धोरणात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी आधी सीबीआयने आणि नंतर ईडीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही अटक करण्यात आली आहे.