केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि ‘शिवसेना’ हे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांकडूनही चिन्हे आणि नावे आयोगासमोर सादर करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाला केवळ नाव देण्यात आलं होतं. शिंदे गटाने सादर केलेली चिन्हे नाकारल्यानंतर शिंदे गटाला नवी चिन्हे दाखल करण्यासाठी आज १० वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला होता.
त्यानंतर शिंदे गटाकडून नव्याने तीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहेत. इमेल करून हे तीन पर्याय सादर करण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडून शंख, तुतारी आणि रिक्षा अशी चिन्हे सादर करण्यात आली आहेत. यावर निवडणूक आयोग आज निकाल देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले असून त्यांना मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले आहे.
हे ही वाचा:
संयुक्त राष्ट्रामध्ये युक्रेनकडून रशियाचा ‘दहशतवादी देश’ म्हणून उल्लेख
“बहुमत असून धनुष्यबाण मिळालं नाही याची खंत”
आशिष शेलार उतरले मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीच्या मैदानात
ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल
धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्ही निवडणूक आयोगाकडून गोठविण्यात आल्यानंतर दोन्ही गटांनी नाव आणि चिन्हांचे पर्याय दिले होते. पण त्यापैकी त्रिशूळ आणि उगवता सूर्य हे पर्याय दोन्ही गटांनी दिल्यामुळे ते आयोगाकडून नाकरण्यात आले. त्यातील तिसरा पर्याय जो उद्धव ठाकरे गटाने दिला होता, तो मशाल हा पर्याय निवडण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी तिसरे चिन्ह गदा पाठविले होते पण धार्मिक चिन्हे वापरता येणार नाहीत, असा नियम असल्यामुळे हे चिन्ह नाकारण्यात आले.