‘झोमॅटो’ ही कंपनी त्यांच्या एका जाहिरातीमुळे अडचणीत आली होती. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा या जाहिरातीत असून त्याने म्हटलं आहे की, “मला भूक लागली होती, म्हणून मी ‘महाकाल’मधून थाली मागवली.” मात्र, यातील ‘महाकाल’ या संदर्भावर महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर ‘झोमॅटो’ कंपनीने ही जाहिरात मागे घेऊन माफी मागितली आहे.
जाहिरातीवरील आक्षेपामुळे आणि विरोधामुळे ‘झोमॅटो’ कंपनीच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यानंतर कंपनीने रविवार, २१ ऑगस्ट रोजी आपली ‘महाकाल’ ही वादग्रस्त जाहिरात मागे घेऊन माफी मागितली. “जाहिरातील ‘महाकाल’चा संदर्भ मंदिराशी नसून रेस्टॉरंटशी होता,” असं स्पष्टकरण कंपनीने दिले आहे.
“आम्ही उज्जैनच्या नागरिकांच्या भावनांचा मनापासून आदर करतो आणि संबंधित जाहिरात यापुढे प्रसारित केली जाणार नाही. कोणाच्याही श्रद्धा आणि भावना दुखावण्याचा हेतू नव्हता,” असेही ‘झोमॅटो’ने म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. या जाहिरातीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या असून कंपनीने जाहिरात मागे घ्यावी आणि कंपनी तसेच हृतिक रोशन यांनी माफी मागावी, अशी मागणी या पुजाऱ्यांनी केली होती. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी याची दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.
महाकालेश्वर मंदिरासमोरील परिसरातच भाविकांना मोफत थाळी दिली जाते. परंतु, जाहिरातीमुळे भाविकांमध्ये संभ्रम होत आहे. कंपनीने आपल्या फायद्यासाठी महाकालेश्वर मंदिराचे नाव घेऊन संभ्रम पसरवला, असे पुजाऱ्यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
‘मेटेंची गाडी ओव्हरेटक करताना ड्रायव्हरचं जजमेंट चुकलं आणि अपघात झाला’
संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना होणार अटक?
‘‘उज्जैनच्या विशिष्ट भागांत दाखवल्या जाणाऱ्या या जाहिरातीला ‘महाकाल रेस्टॉरंट’मधील ‘थाली’चा संदर्भ आहे. पूजनीय श्री महाकालेश्वर मंदिराचा संदर्भ नाही. ‘महाकाल रेस्टॉरंट’ हे उज्जैनमधील आमच्या रेस्टॉरंट भागीदारांपैकीच एक आहे. त्याच्या मेनूमध्ये ‘थाली’चा समावेश आहे,’’ असं स्पष्टीकरण झोमॅटोने दिलं आहे.