ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित

व्हीडिओ व्हायरल, त्याला हस्तांतरित करण्याची भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने केली मागणी

ओमानमधील भर कार्यक्रमात झाकीर नाईकने हिंदू महिलेला केले धर्मांतरित

धार्मिक भाषणे देण्यासाठी ओमानमध्ये गेलेला फरारी धर्मगुरू झाकीर नाईकने एका हिंदू महिलेला धर्मांतरित केल्याची घटना घडली असून त्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

मस्कतमध्ये सध्या गेलेल्या झाकीर नाईकने भारताविरुद्ध पुन्हा एकदा विष ओकले असून एका महिलेचे कार्यक्रमातच धर्मांतरण केल्याचा दावा केला आहे.

२३ मार्चला ओमानमधील एका कार्यक्रमात व्याख्यानासाठी झाकीर नाईक उपस्थित होता. त्याने या कार्यक्रमात एका महिलेला तिचे नाव विचारले. तिने तिचे नाव आरती असल्याचे सांगितले. तेव्हा तिला काही प्रश्न विचारले आणि तिचे धर्मांतरण झाल्याचा दावा केला. अल्लाला तुम्ही मानता का, अल्लाशिवाय आणखी कुणीही वंदनीय नाही हे तुम्हाला मान्य आहे का, पैगंबर हेच अंतिम प्रेषित आहेत हे मान्य आहे का? अशा प्रश्नांना आरती नावाच्या महिलेने हो असे उत्तर दिल्यानंतर तिने आता इस्लाम धर्म स्वीकारला आहे, ती आता पापरहित आहे, असा दावा केला. आता आपल्या कुटुंबातील व जवळच्या लोकांनाही तिने इस्लाम कबूल करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही झाकीर नाईकने सांगितले.

या व्याख्यानादरम्यान झाकीर नाईकने सांगितले की, २०१८मध्ये ईडीकडून माझी सगळी संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरू होती. तेव्हा एका शीख न्यायाधीशाने सांगितले की, माझ्या कोणत्याही भाषणात त्यांना काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. माझे असे कोणतेही भाषण दाखवून द्यावे ज्यातून मी दहशतवादाला प्रोत्साहन देतो, असेही न्यायाधीशांनी वकिलाला सांगितले. जर तसे दाखविण्यात आले तर मी झाकीर नाईक यांची सगळी संपत्ती जप्त करण्याचे आदेश देईन, असेही या शीख न्यायाधीशाने सांगितल्याचा दावा झाकीर नाईकने केला.

हे ही वाचा:

खुष खबर…केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांच्या डीएमध्ये झाली इतकी घसघशीतवाढ 

मी महाराष्ट्राची मुलगी, आज माहेरी आल्यासारखे वाटते आहे!

केंद्र सरकारचा सामान्यांना मोठा दिलासा, सिलिंडरसाठी मिळणार २०० रुपये सबसिडी

सॅन फ्रन्सिस्कोमध्ये खलिस्तानी समर्थकांसमोर उभे ठाकले भारतीय: एकजुटीचे दर्शन

झाकीर नाईक असेही म्हणाला की, भारतातील बहुसंख्य हिंदू माझ्यावर प्रेम करतात. त्यामुळे व्होट बँकेसाठी ते त्रासदायक ठरते आहे. भारतात जेव्हा माझे भाषण होते तेव्हा हजारो लोक ते ऐकण्यासाठी येतात. बिहार, किशनगंजमधील अनेक लोक माझ्या भाषणाला येतात त्यातील २० टक्के लोक हे गैरमुस्लिम आहेत. म्हणजे १ अब्ज हिंदूंपैकी २० कोटी हिंदू माझ्या भाषणामुळे प्रभावित आहेत.

यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची यांनी सांगितले की, नाईक हा अनेक प्रकरणात फरारी आहे. ओमान सरकारने त्याला आमच्याकडे सोपवावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

सध्या झाकीर नाईक हा मलेशियात स्थायिक असून २०१६मध्ये तो भारतातून पळाला आहे. त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली असून त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याचे टीव्ही नेटवर्क बांगलादेश, कॅनडा, श्रीलंका व ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आलेले आहे.

Exit mobile version