यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?

संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?

विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून हे अतिक्रमण आता जमीनदोस्त व्हायलाच हवे, अशी भूमिका आता विविध स्तरावर घेतली गेली आहे. स्थानिक प्रशासनानेही हे अतिक्रमण हटविणार असल्याचे म्हटले आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी विशाळगडावर आंदोलन केले होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आल्यानंतर ते शाहूवाडी पोलिस ठाण्यात गेले. नंतर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, प्रशासनाने या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष केले. मग आताच त्यांनी ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश कसे काय दिले?

संभाजीराजे यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनाही लक्ष्य केले आणि सवाल विचारला की, मला पुरोगामित्व शिकवतो, एक स्थानिक नेता, पालकमंत्री. माझा प्रश्न त्यांना की दीड वर्ष हा विषय न्यायप्रविष्ट नसताना तुम्ही न्यायप्रविष्ट आहे असे कसे म्हणता? मग आज अतिक्रमण हटविणार हा निर्णय कसा काय घेतला प्रशासनाने. असाच घेतला की काय, शाहू महाराजांचे पुरोगामित्व मला शिकवू नका. शाहू महाराजांची जयंती संसदेत मी सुरू केली. आजपर्यंत एकदाही शाहू महाराजांची जयंती संसदेत झाली नव्हती. मी सुरुवात केली. मला हे पुरोगामित्व शिकवणार?

संभाजीराजे म्हणाले की, यासिन भटकळ  हा अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा सदस्य आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी आहे. भारतातील विविध बॉम्बस्फोटातील तो भाग होता. हा भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे. मोठा अतिरेकी किल्ल्यावर राहिला तेव्हा या महाशयांचे पुरोगामित्व कुठे गेले होते. शाहू महाराजांच्या घराण्यात माझा जन्म झाला. मला पुरोगामित्व शिकवू नये.

संभाजीराजे म्हणाले की, मी विशाळगडावर येणार आहे हे माहीत होते, शिवभक्तांमध्ये आक्रोश आहे मग तुम्ही यंत्रणा का लावली नाही? ज्या विशाळगडने शिवाजी महाराजांचे रक्षण केले. स्वराज्याचे रक्षण केले. ज्या किल्ल्यावर संभाजी राजे, राजाराम महाराज, ताराराणी यांचे वास्तव्य होते. या विशाळगडावर जो गलिच्छपणा चालतो तो सहन करू शकता तुम्ही?

संभाजीराजेंनी प्रश्न उपस्थित केला की, माझा प्रश्न प्रशासनाला आहे की तुम्ही मला विशाळगडावर का येऊ दिले? तुम्हाला निर्णय द्यायचा होता, विशाळगड अतिक्रमणमुक्त करायचा होता तर शिवभक्तांची परीक्षा का पाहिलीत. संभाजीराजे यांनी खंत व्यक्त केली की, मी हा विषय पूर्वी घ्यायला हवा होता, पण माझी जबाबदारी असताना मी विषय उचलला नाही.

हे ही वाचा:

मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा

आसाममध्ये ५० लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल हा दावा ठरला फोल

धार भोजशाळा-कमल मौला मस्जिद परिसरात सापडली सरस्वतीची मूर्ती

राज्यातील वातावरण शांत व्हावे म्हणून पवारांना भेटलो !

 

शाहूवाडी पोलिस ठाण्यात दीडतास ठिय्या

 

संभाजी राजे यांच्याविरोधात शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आल्यानंतर संभाजीराजे तिथे गेले आणि दीड तास त्यांनी तिथे ठिय्या दिला पण त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे अथवा नाही, हे पोलिसांनी सांगितले नाही.

त्यानंतर ते म्हणाले की, विशाळगडावरील अतिक्रमणे हटवतना तिथे हिंदू मुस्लिम असा भेद नको. ज्यांची अनधिकृत बांधकामे असतील ती हटवली गेली पाहिजेत.

 

दरम्यान, कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी म्हटले होते की, संभाजीराजे यांनी विशाळगडावर जे आंदोलन केले त्यामुळे तिथे हिंसक परिस्थिती निर्माण झाली. त्याचा मी निषेध करतो. या हिंसाचारात ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी मागणीही शाहू महाराजांनी केली. विशाळगडावर ते पाहणीसाठी जाणार असल्याचेही शाहू महाराजांनी सांगितले.

 

Exit mobile version