अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती दर्ग्याच्या जागी शिवमंदिर होते ?

काय आहे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आणि पुरावे ?

अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती दर्ग्याच्या जागी शिवमंदिर होते ?

श्रीकांत पटवर्धन

अजमेरच्या न्यायालयाने या संबंधातील याचिका दाखल करून घेतली असून अर्जकर्त्यांचे म्हणणे तिथे पूर्वी शिवमंदिर असल्याचे आहे. अर्जदारांची मागणी दर्ग्याची पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण केले जावे, अशी आहे. त्यासाठी त्याने काही जुन्या ग्रंथांचा आधार घेतला आहे. (या संदर्भात लेखकाची स्वतःची एक जुनी आठवण जागी झाली. आम्ही राजस्थानात, जयपूर येथे बँकेच्या नोकरी निमित्ताने अनेक वर्षे होतो. त्यावेळी कितीतरी वर्षांपूर्वी, अजमेर परिसरात तिथले जुने लोक –
अजमेर शरीफ दर्ग्याच्या तळघरात प्राचीन शिवलिंग असल्याचे सांगत. बँकेत असल्याने, काही लोकांनी तर – दर्ग्याचे बँक संबंधी व्यवहार, खाती आपल्याकडेच आहेत; इच्छा असल्यास आपण दर्गा समितीच्या उच्चपदस्थांकडून परवानगी मिळवून खाली जाऊन बघू शकतो, असेही सांगितल्याचे स्मरते. दुर्दैवाने तेव्हा त्यात तितका रस न घेतल्याने ती संधी हुकली. पण आज ही बातमी आल्यावर ती आठवण जागी होणे स्वाभाविक. असो.)

न्यायालयाने या संदर्भात नोटीसा – केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालय, पुरातत्व सर्वेक्षण विभाग, आणि अजमेर दर्गा समिती – यांना बजावल्या असून, त्यांना याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. याचिका हिंदू सेना अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी केली असून, त्यांचे म्हणणे थोडक्यात असे, की तेराव्या शतकात निधन पावलेल्या “सूफी संत” ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांची कबर , ते स्थळ, वास्तविक एक शिव मंदिर आहे. त्यामुळे, अजमेर दर्ग्याला यापुढे संकटमोचन महादेव मंदिर संबोधले जावे, आणि त्या स्थळावर हिंदू पूजा अर्चना सुरु केली जावी, अशी मागणी ते करतात. यासाठी गुप्ता कोणत्या जुन्या ग्रंथांचा, अजमेरच्या इतिहासाचा आधार घेतात, ते आता बघू.

यासाठी गुप्ता व त्यांचे वकील योगेश सिरोजा हे मुख्यतः हर बिलास सारडा (१८६७ -१९५५) नावाच्या (आधी न्यायाधीश व मागाहून राजकारणी) व्यक्तीच्या १९११ साली प्रकाशित झालेल्या ग्रंथाचा आधार घेतात. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार या ग्रंथात दर्ग्याच्या खाली (तळघरात) हिंदू शिव मंदिर असल्याचा उल्लेख आहे. हर बिलास सारडा यांच्या १९१० साली लिखित ग्रंथाचे नाव आहे – “अजमेर ऐतिहासिक आणि वर्णनात्मक”. हा ग्रंथ स्कोटीश मिशन कंपनी ने १९११ प्रकाशित केला. अजमेर शहराचा एखाद्या ज्ञानकोशासारखा सखोल धांडोळा घेणाऱ्या या ग्रंथाने दर्ग्याच्या खाली असलेले तळघर आणि त्याविषयी प्राचीन महादेव मंदिराशी संबंधित परंपरा, आख्यायिका यांवर बराच प्रकाश टाकला आहे. यातील काही भाग इथे उद्घृत करतो, तो असा :

“आधीच म्हटल्याप्रमाणे, ख्वाजा यांच्या मृत देहाचे अवशेष त्यांच्या कबरीच्या कितीतरी फूट खाली, तळघरातील एका बंदिस्त कक्षात विटांच्या थराच्या खाली ठेवण्यात आलेले आहेत. कबर ही शुभ्र संगमरवराची असून, त्यावर विविध रंगी मौल्यवान खडे (Precious stones) बसवण्यात आले आहेत. असे सांगितले जाते, की खाली ठेवलेल्या मृत शरीरातील हृदयाच्या जागी रुबी नामक – साधारण तत्कालीन आठ आण्याच्या चांदीच्या नाण्याच्या आकाराचा – खडा बसवलेला आहे.” – (हर बिलास सारडा – अजमेर ऐतिहासिक आणि वर्णनात्मक) आता स्थानिक परंपरा, आख्यायिका असे सांगतात, की ह्या भूमिगत कक्षात महादेवाचे मंदिर असून, तिथे प्रतिदिन, चंदनादि उपचारांनी पूजा एका ब्राह्मण कुटुंबाकडून केली जात असे. ही  प्रथा दर्गा समितीकडून ही पाळली जात असून, त्या कुटुंबाची वंशपरंपरा नेमणूक ‘घडियाली” (घड्याळाचे ठोके / घंटा वाजवणारे) म्हणून केली गेली आहे. सारडा यांच्या ग्रंथात याचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे, मूळ मंदिर पाडण्यात आले, किंवा कसे याविषयी मात्र त्यात उल्लेख नाही.

हे ही वाचा:

“भाजपच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या निर्णयाला मनात किंतू- परंतु न ठेवता पाठींबा”

पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्राला ईडीचे समन्स

तेलंगणामध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा

भारतीय एजंट असल्याच्या संशयावरून बांगलादेशमध्ये महिला पत्रकाराला घातला घेराव

आता आपण या संदर्भातील दुसऱ्या दोन पुस्तकांचा मागोवा घेऊ. त्यातील एक आहे, १९८९ मधील ब्रिटीश इतिहासकार पी.एम. क्युरी यांचे पुस्तक – “अजमेरच्या ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांचा दर्गा व पंथ” (The shrine and cult of Muin al-din Chisti of Ajmer) क्युरी यांनी त्यांच्या पुस्तकात आर एच आयर्विन यांच्या १८४१ मधील पुस्तकाचा उल्लेख केला आहे, ज्याचे नाव आहे – “सर्वसाधारण आणि वैद्यकीय दृष्ट्या अजमेर येथील भूपृष्ठ शास्त्रीय माहितीचे
संकलन” (Some Account of the General and Medical Topography of Ajmeer 1841). यामध्ये, तळटीपेमध्ये लेखकाने सूफी संत ख्वाजा मोइनुद्दिन चिस्ती यांच्या काळात तिथे अस्तित्वात असलेल्या प्राचीन महादेव मंदिराचा उल्लेख केलेला आहे. तो असा : “या भागात एके ठिकाणी एक प्राचीन महादेव मंदिर होते, त्यातील शिवलिंग जंगलातील पाला पाचोळा, कचरा, यांत झाकले गेले होते. ह्या जंगलातील एके ठिकाणी ख्वाजा यांनी चाळीस दिवस ध्यान धारणेत घालवले. त्यावेळी दररोज ते आपले पाण्याचे भांडे (कमंडलू?) एका झाडाच्या फांदीला लटकवून ठेवीत. योगायोगाची गोष्ट म्हणजे, त्या भांड्यातून जे पाणी थोडे थोडे सतत ठिबकत असे, ते त्या प्राचीन शिवलिंगावर पडत असे. ह्या सतत होणाऱ्या (नकळत) जलाभिषेकाने व सात्विकतेने महादेव प्रसन्न झाले. असे म्हणतात, की साक्षात महादेव ख्वाजा यांच्याशी बोलले, त्यांच्या तपः साधनेचे कौतुक केले.

या पारंपारिक आख्यायिकेमुळेच – जी एका अत्यंत विद्वान मुस्लीम धर्मपंडिता कडूनही ऐकण्यात आली, – हिंदू आणि मुस्लीम दोन्ही पंथाचे लोक ख्वाजा यांना सारखेच आदरणीय मानतात.” क्युरी यांनी त्यांच्या १९८९ च्या ग्रंथात आर एच आयर्विन यांचा संदर्भ देऊन ह्याचा उल्लेख केला आहे. याचिकाकर्त्यांनी दर्ग्याच्या पुरातत्व सर्वेक्षणाची मागणी करताना या ग्रंथांचा आधार घेतलेला नाही. हर बिलास सारडा यांनी त्यांच्या १९११ च्या ग्रंथात अजमेर दर्ग्याच्या ७५ फूट उंचीच्या बुलंद
दरवाज्याच्या उत्तरेकडील भागात आढळणाऱ्या हिंदू संस्कृती दर्शक चिन्हांचा उल्लेख केला आहे. (फत्तेपूर सिक्री, आग्रा येथील बुलंद दरवाजाशी या दरवाज्याचा काही संबंध नाही. केवळ भव्य असल्याने त्याला बुलंद म्हटले जाते, इतकेच.)

या ७५ फुटी दरवाज्यावर दोन छत्र्या असून दरवाज्याला दोन्ही बाजूंनी आधार देण्यासाठी तिमजली छत्र्या आहेत, ज्यावर दगडांवर सुंदर कोरीव नक्षीकाम केलेले दिसते. हा निश्चितच एखाद्या हिंदू मंदिराच्या इमारतीचा भाग असल्याचे जाणवते. बांधकामाचे सामान व त्याची शैली मुळात हिंदू असल्याचे स्पष्ट दिसते. स्तंभांवरील सुंदर कोरीव काम हे दुर्दैवाने अनेक
रंगांचे आणि चुन्याच्या सफेदीचे (White washing) थर चढवल्याने दिसेनासे झाले आहे. ते थर उतरवल्यास मूळ कोरीव काम दिसू शकेल. या छत्र्या आणि दरवाजा ही लाल रंगाच्या sand stone ने बनवलेली असून, ते एका पाडण्यात आलेल्या प्राचीन जैन मंदिराचे अवशेष असल्याचा उल्लेख सारडा यांनी केला आहे.

११९२ मधील दुसऱ्या तराई युद्धानंतर अजमेर सहित उत्तर हिंदुस्थानचा बराच भाग मुहम्मद घोरी याच्या सत्तेखाली आला. १२०६ मध्ये घोरीच्या मृत्यू नंतर गुलाम वंशाची सत्ता आली, ज्याचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक होता. अजमेर दर्ग्याच्या बांधकामाला सुलतान इल्तत्मिष (१२११ -१२३६) याच्या कारकिर्दीतझाली, आणि पुढे हुमायून पासून शाहजहान पर्यंत अनेक मुघल बादशहांच्या काळात त्यात भर घातली गेली. अशातऱ्हेने या अजमेर दर्ग्या बाबत – तिथल्या मूळ महादेव मंदिरा बाबत – असलेला कैक शतकांचा संभ्रम किंवा वाद आता गुप्ता यांच्या याचिकेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशात या आधीच – काशी येथील ग्यानवापी मशीद, मथुरेची कृष्ण जन्मभूमी, आणि आता नव्याने पुढे आलेला संभल , उत्तरप्रदेश येथील जामा मशिदीचा वाद – हे न्यायप्रविष्ट आहेतच. त्यात अजमेर दर्ग्याची भर पाडली आहे. अजमेर
येथील जानेवारीतील वार्षिक उत्सव (उरूस) हा जगभरात प्रसिद्ध आहे. त्या दर्ग्याला सर्व धर्मपंथाचे लोक दरवर्षी भेटी देतात, व तो सांप्रदायिक सद्भावाचे, भारतीय सहिष्णुतेचे प्रतीक मानला गेलेला आहे. पण त्याबरोबरच साधारण इ.स. १२०० पासून सतत सहा सातशे वर्षे झालेल्या परकीय मुस्लीम आक्रमकांकडून, त्यांच्या सत्ताकाळात देशातील हिंदूंची मूळ प्राचीन मंदिरे प्रचंड संख्येने पाडली गेली, हा इतिहास नाकारता येत नाही.

 

मुस्लिमातील सूफी पंथाच्या संतांचे कौतुक केले जाते, पण कुणाही सूफी संताने कधी कुठलेही हिंदू मंदिर पाडण्याचा साधा निषेधही केलेला नाही, हे विसरून चालणार नाही. सूफी हे मुस्लिमच; आणि त्यांचा हिंदू किंवा इतर अनेकेश्वर वादी धर्म पंथांना कायम, कठोर विरोधच आहे. त्यामुळे सूफी म्हणजे कोणी हिंदू प्रेमी, सहिष्णू पंथ नव्हे, हे लक्षात घ्यावे लागेल. अजमेर न्यायालयाने याचिकेवरील पुढील सुनावणी २० डिसेम्बर २०२४ रोजी ठेवली होती, पण नुकत्याच मिळालेल्या माहितीवरून, सर्वोच्च न्यायालयाने – जोवर राजस्थान उच्च न्यायालय त्यांच्याकडे आलेल्या याचिकेवर सुनावणी घेऊन आदेश देत नाही, तोवर – स्थगिती दिलेली आहे. ग्यानवापी, मथुरा, संभल, आणि आता अजमेर ……. थोड्याफार फरकाने सर्व हिंदू मंदिरांची हीच स्थिती आहे. इसवी सन १२०० पासून हजारो मंदिरे पाडली गेली, आणि हे सर्वज्ञात असूनही आज स्वतंत्र भारतात हिंदूंना मात्र त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी, पुनर्स्थापनेसाठी, न्यायालयीन लढाई लढत राहावी लागते, हे दुर्दैव आहे. हिंदू समाजाच्या सहिष्णुतेचा तुटेपर्यंत अंत पाहिला जाऊ नये, इतकीच अपेक्षा.

Exit mobile version