वर्षभरापूर्वी देशात इतिहास घडला होता. हिंदूंनी शेकडो वर्ष पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता झाली. अयोध्या नगरीमध्ये श्रीराम लल्लांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तिथीनुसार आज संपन्न झाला होता. राष्ट्राचा अंतरात्मा धन्य धन्य करणाऱ्या या सोहळ्यातचा मी केवळ साक्षीदारच नाही तर भागीदार बनलो. श्रीराम लल्ला परिसर सजवण्याची, नटवण्याची भूमिका मला पार पाडता आली. एक खारीचा वाटा उचलता आला. कोणताही अनुभव गाठीशी नसताना केवळ रामकृपेने ही संधी लाभली, असं म्हणता येईल.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने सजावटीची जबाबदारी सांभाळणार का अशी विचारणा केली. न्यासाकडून अशी विचारणा होताच मन अगदी मोहरून गेले होते. यासोबतच दिलेल्या जबाबदारीची जाणीव देखील मनात पक्की होती कारण हे काम अजिबात सोपे नव्हते. संपूर्ण जगाचे लक्ष या सोहळ्याकडे लागले होते. माझ्या दृष्टीने हे मोठे आव्हानच होते. यासाठी कौशल्यासह नियोजनाची आवश्यकता होती. या तयारीसाठी दीड महिना होता. अयोध्येतील वातावरण, मंदिर रचना, नैसर्गिक फुलांचा वापर यासाठीचा आग्रह अशी सर्वच आव्हानं समोर उभी होती. या दीड महिन्याच्या काळात आम्ही मंदिराच्या कोणत्या भागात काय सजावट करायची याचे पहिले नियोजन केले.
प्रत्यक्ष काम ११ डिसेंबरला सुरू झाले. त्या भागात थंड वातावरण असले तरी फुले टवटवीत ठेवणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी खास स्पंज, वॉटर कॅप्सूल आणल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे मंदिराच्या मूळ सौंदर्याला कोठेही बाधा न आणता हे काम करायचे होते. त्यामुळे कौशल्य पणाला लागले होते. दोन्ही सजावटी पूरक असतील याची खबरदारी घेतली. अँध्युरीयम, लिलियम अशा फुलांचा जास्त वापर केला. संपूर्ण सजावटीत कुठेही कृत्रिम फुले न वापरता, नैसर्गिक फुलांचाच वापर केला. पुणे, दिल्ली, लखनऊ, चेन्नई आणि बंगळुरूसह देशाच्या विविध भागांतून २२ ते २३ प्रकारची फुले आणली. गर्भगृहासाठी दक्षिणेतील राज्यातून सुवासिक फुले आणली. मंदिराच्या बाहेरील बाजूस प्लांटर्सचा, सजावटीच्या साधनांचा वापर केला.
मंदिराच्या प्रत्यक्ष सजावटीला १८ जानेवारी रोजी सुरुवात झाली. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान होते आणि ते आम्ही पूर्ण केले. वेगवेगळ्या शहरांतून विशेष बॉक्समध्ये फुले बांधून आणली होती. त्यामुळे ती टवटवीत राहिली. एकूण तीन पथकांतून ३५० स्वयंसेवक या कामासाठी काम करत होते. मंदिराच्या सजावटीसाठी एकूण ३,५०० किलो फुले लागली. मुख्य गर्भगृह, संपूर्ण मंदिर, अतिविशिष्ट पाहुण्यांचे दालन (ग्रीन रूम), कुबेर टिला, शंकर मंदिर येथे फुलांची आकर्षक अशी सजावट केली.
हे ही वाचा :
राजकीय जीवन काही लोकांच्या नशिबात असते, त्यांना काहीही करावे लागत नाही!
प्रयागराज महाकुंभात साडेतीन वर्षांचा श्रवण बाळ!
महापुरुषांच्या जयंतीनिमित्त ‘जयंती फलक’ लावण्याचा शासनाचा निर्णय!
‘EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’
याशिवाय काही ठिकाणी फुलांची तर काही ठिकाणी प्रत्यक्ष रांगोळी काढली. रंगसंगतीचा जास्त विचार करून कौशल्य पणाला लावले. मंदिराच्या प्रवेशमार्गावर, रस्त्याच्या दुतर्फा विविध संकल्पनांवर आधारित १ हजार २५० चित्रे लावली. रामायणातील सात कांड, बालराम ते सिंहासनाधिष्ठ राम आणि श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील योद्धे या संकल्पनेवर आधारित अशी चित्र होती. फुलझाडांच्या सजावटीसाठी ‘राम वाटिका’, तर चित्रांसाठी ‘टेम्पल कनेक्ट’ या संस्थांना संपर्क केला आणि या कामांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती.
प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या सजावटीचे सर्वच स्तरातून कौतुक झाल्याने दीड महिन्यांचे परिश्रम फळाला आल्याची भावना मनात दाटून आली होती. प्राणप्रतिष्ठेच्या या अलौकिक सोहळ्याला उपस्थित राहता येणं आणि या कामाचा भाग होता येणं, ही प्रभू श्रीरामांचीच कृपा आहे. संघटनेचा पाठिंबा आणि आई-वडिलांच्या आशीर्वादानेच ही संधी मिळाली.