विधानसभा अध्यक्षांची घोषणा, अधिवेशनात आग्रह धरणार
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अवघे आयुष्य हे प्रखर राष्ट्रभक्तीचे धगधगते अग्निकुंड आहे. त्यांच्यासारखा वीरपुरुष शतकातून एकदाच जन्माला येतो. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रकार्याची माहिती देणारे संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारावे, यासाठी येत्या अधिवेशनात आग्रह धरणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्साय बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक उडीला ८ जुलै २०२२ रोजी ११२ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात राज्य विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते वीर सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
नार्वेकर म्हणाले, विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतरचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम. कारकीर्दीची सुरुवात अशा चांगल्या कार्यक्रमाने झाल्यामुळे विशेष आनंद आहे. सुरुवात चांगली झाली की, पुढची वाटचालही चांगलीच होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची देशातील नागरिकांना माहिती देणे हे आपले कर्तव्य आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांनी मोठे योगदान दिले. क्रांतिकारकांना वाट चुकलेले देशभक्त म्हणणे, हा त्यांच्यावर इतिहासाने केलेला अन्याय आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेनेतील बंडाळी आणि आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विचारले असता नार्वेकर म्हणाले, राज्यघटनेतील परिशिष्ट १० मध्ये सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भातील तरतुदींचा समावेश आहे. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षात अंतर आहे. विधिमंडळ पक्षातील सदस्य आपला नेता निवडतात आणि त्या नेत्याकडून प्रतोद निवडला जातो. याऊलट राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा वेगळा असल्याने त्यांच्याबाबतचे निर्णय हे निवडणूक आयोगाकडून घेतले जातात. त्यामुळे उपरोक्त प्रश्नांसदर्भात न्यायालय आणि निवडणूक आयोग योग्य तो निर्णय देईल.
एखाद्या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा अधिकार हा संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे. पण विधिमंडळात बहुमत असलेल्या पक्षाला ग्राह्य धरले जात असल्याने बहुमतधारी गटाने नेमलेल्या प्रतोदाला आणि नेत्यालाच मान्यता देणे हे कायद्याला धरुन असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी केले. स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी स्मारकाच्या वतीने अध्यक्षांचे आभार मानले.
मार्साय येथे वीर सावरकरांचे स्मारक व्हावे – रणजित सावरकर
मार्साय समुद्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मारलेली उडी ही अयशस्वी असल्याचा प्रचार केला जातो. पण सावरकरांची उडी ऐतिहासिक होती, त्यांच्या एका उडीने जगात फार मोठा भूकंप झाला. इंग्रज आपल्या देशावर बळजबरीने राज्य करत आहेत, हे सत्य संपूर्ण जगाला त्या उडीमुळे कळले. भारताचा स्वातंत्र्यलढा जगाच्या पटलावर आला. त्यामुळे मार्साय बंदरात वीर सावरकरांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली.
हे ही वाचा:
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट
बीकेसीजवळच्या एका झोपडीत सापडला नागोबा!
काळ बदलतोय! रणजीत सावरकरांना विधान परिषद सदस्यत्व मिळणार?
‘धनुष्यबाण कुणीही हिरावून घेऊ शकत नाही’
या स्मारकासाठी सावरकरप्रेमींकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. मार्सायमध्ये स्मारक उभारणीसाठी आर्थिक सहाय्य करण्याची तयारी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने दर्शविली आहे. परंतु, मार्साय येथील नगरप्रशासनाला हा प्रस्ताव भारत सरकारकडून द्यावा लागणार असल्याने अनेक वर्षांपासून हे प्रकरण लालफीतीत अडकले आहे. केंद्रातील आताच्या सरकारकडे सत्ता आणि शहाणपण दोन्ही आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा लावून धरणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपने प्रयत्न करावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना अस्सल मराठी शब्द दिले. कायदा या परशीयन शब्दाला विधि हा शब्द सावरकरांनी दिला. वकील म्हणजेच कायद्याचा तज्ज्ञ, म्हणून तो विधिज्ञ असा शब्द त्यांनी रुढ केला. अनेक संसदीय शब्द सावरकरांनी मराठीतून दिले आहेत. विधान परिषद, विधिमंडळ हे शब्द त्यांनी दिले. सावरकरांना कधीही संसदेत जाता आले नाही. पण त्यांनी संसदीय क्षेत्रात दिलेल्या योगदाची माहिती विधिमंडळातील सदस्यांना व्हावी, यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी रणजित सावरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.