दर १२ वर्षांनी होणारा कुंभमेळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना देशभरासह जगभरातील भाविकांनी प्रयागराजला जाण्याची तयारी सुरू केली आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या मेळ्यासाठी येत असतात. कुंभमेळा जानेवारी महिन्यात प्रयागराजला होणार आहे. भाविकांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे तेथील गर्दीचे नियोजन आणि सुरक्षेच्या दृष्टीने तयारीला वेग आला आहे.
प्रयागराजसोबतच अयोध्येतील अधिकारीही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या नियोजनाची तयारी करत आहेत. प्रयागराजमध्ये महाकुंभ- २०२५ ला भेट देणारे बरेच लोक राम लल्लाचे आशीर्वाद घेण्यासाठी राम मंदिरात येण्याची शक्यता आहे. अयोध्या महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार १३ जानेवारी ते १२ फेब्रुवारी या कालावधीत सुमारे अडीच कोटी भाविक शहरात येण्याची शक्यता आहे. नवीन वर्षाच्या दिवशी मंदिरात सुमारे तीन ते पाच लाख भाविकांची येण्याची अपेक्षा नागरी संस्थेच्या अधिकाऱ्यांना आहे.
पुढील वर्षी १३ जानेवारी रोजी महाकुंभ मेळ्याला सुरुवात होईल. त्यानंतर २६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत हा सोहळा चालेल. प्रयागराजमध्ये दर १२ वर्षांनी महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं जातं. आगामी धार्मिक कार्यक्रमाचे अधिक चांगले व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासन आणि सरकार तयारीला लागले असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाकुंभ मेळ्यासाठी एक स्वतंत्र जिल्हाच योगी सरकारने जाहीर केला असून या जिल्ह्याचे पूर्ण व्यवस्थापन स्वतंत्र असेल, असं जाहीर करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने भाविक या मेळ्यासाठी येत असतात त्यांचे योग्य नियोजन व्हावे यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, नोबेल पुरस्कार विजेते जिमी कार्टर यांचे निधन
बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांकडून हिंदू व्यक्तीची हत्या, घराबाहेरील झाडावर लटकवले!
मौलाना बरेलवी म्हणतात, नवे वर्ष साजरे करणे हा इस्लाममध्ये गुन्हा
संविधान, महाकुंभ, मलेरियाचा पराभव आणि कॅन्सरवर उपचार!
दुसरीकडे, भारतीय रेल्वे १२ जानेवारी ते २८ फेब्रुवारीदरम्यान कुंभमेळ्यासाठी देशभरातून ९९२ विशेष गाड्या चालविणार आहे. त्याशिवाय आयआरसीटीसीतर्फे देशभरात १३ ‘भारत गौरव ट्रेन’ चालवण्यात येणार आहेत. तर, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडनकडून भाविकांच्या सुविधेसाठी ‘महाकुंभ ग्राम’ नावाचे एक लक्झरी टेंट सिटी उभारणार आहे. या टेंट सिटीमध्ये ४०० टेंट असतील आणि यात एक हजार भाविकांची राहण्याची सोय होऊ शकणार आहे.