४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलमधील मंदिराजवळील विहिरीतून सापडल्या तीन मूर्ती

दोन मूर्ती पार्वती आणि लक्ष्मी या देवींच्या असल्याचे निरीक्षण

४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलमधील मंदिराजवळील विहिरीतून सापडल्या तीन मूर्ती

उत्तर प्रदेशातील संभल येथील भस्म शंकर मंदिराजवळील विहीर खोदताना सुमारे चार ते सहा इंचाच्या तीन मूर्ती सापडल्या आहेत. हे मंदिर १३ डिसेंबर रोजी ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले होते. यातील दोन मूर्ती पार्वती आणि लक्ष्मी या देवींच्या असल्याचे दिसून येत आहे. कामगारांनी विहीर १५ ते २० फूट खोल खोदल्यानंतर या मूर्ती खराब अवस्थेत आढळून आल्या आहेत.

विहीर खोदणारे एक मजूर वीरपाल सिंग यांनी सांगितले की, “आम्ही २० फूट खोलवर गेल्यावर मूर्ती सापडल्या. मूर्ती स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आल्या आहेत.” ही विहीर भस्म शंकर मंदिरापासून सुमारे १० मीटर अंतरावर आहे. ज्यामध्ये भगवान हनुमानाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. संभलमधील अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यांनी जातीय दंगलींमुळे १९७८ पासून बंद असलेले हे मंदिर उघडले. दंगलीमुळे या परिसरात राहणारी अनेक हिंदू कुटुंब विस्थापित झाली होती.

मंदिरातील मूर्ती आणि विहीर सापडल्यानंतर, संभल प्रशासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (एएसआय) देखील मंदिराची कार्बन डेटिंग करण्यासाठी पत्र लिहिले आहे. “आम्ही एएसआयला मंदिर आणि विहिरीच्या कार्बन डेटिंगबाबत पत्र लिहिले आहे. हे कार्तिक महादेवाचे मंदिर आहे. येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आली आहे, तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. मंदिरात पूजाही सुरू झाली आहे. येथे अतिक्रमण आहे, जे काढले जात आहे,” असे जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

सोनिया गांधींनी घेतलेली नेहरूंची पत्रे परत करा

ईव्हीएमवर विश्वास नसेल तर निवडणुका लढवू नका! ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, सर्वसमावेशक मंत्रिमंडळ

हिंदूंवरील अत्याचारा विरोधात मुलुंड चेकनाका ते विक्रोळीत ‘मानव शृंखला अभियान’

मशिदीच्या आजूबाजूच्या भागात अतिक्रमण काढण्यासाठी आणि वीजचोरी रोखण्यासाठी संभल प्रशासन मोहीम राबवत आहे. दरम्यान, अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान अनेक स्थानिक लोक मंदिराजवळ जमले आणि त्यांनी मूर्ती उघडताना पाहिले. १९७८ मध्ये परिसर सोडलेल्या लोकांनीही मंदिराच्या आठवणी सांगितल्या. ८२ वर्षीय विष्णू शंकर रस्तोगी म्हणाले की, “माझ्या जन्मापासून मी खग्गु सराय येथे राहतो. १९७८ च्या दंगलीनंतर आमच्या समुदायाला या भागातून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले. या मंदिराला तेव्हापासून कुलूप आहे.”

Exit mobile version