राज्यामध्ये ७ ऑक्टोबरपासून मंदिराचे द्वार उघडणार आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे बऱ्याच कालावधीपासून बंद होती. भाजपाकडून तसेच विविध संघटनांकडून सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी करण्यात आली होती. मंदिरे उघडण्यासाठी राज्यात तसेच आंदोलनेही करण्यात आली.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी अखेर धार्मिक स्थळे खुली करण्यास हिरवा कंदील दाखवला. त्यामुळेच आता नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येत आहेत. परंतु याकरता अनेक नियमावलींना भाविकांना सामोरे जावे लागणार आहे. मुख्य म्हणजे दोन लस ज्यांनी घेतलेली आहे अशाच व्यक्तींना मंदिर प्रवेश परवानगी देण्यात येणार आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सर्व धार्मिक स्थळांमध्ये उपस्थितांची संख्या एकूण क्षमतेच्या ५० टक्केपर्यंत मर्यादित असणार आहे. तसेच धार्मिक स्थळांच्या ठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन करणे आवश्यक असणार आहे. प्रसाद, हार, फुले भाविकांना अर्पण करता येणार नाही. त्याचबरोबर मूर्तीला स्पर्शही करता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, व इतर उपाययोजना अनिवार्य राहणार आहेत. मुख्य म्हणजे ६५ वर्षांवरील नागरिक, सहव्याधी असलेले नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षाखालील मुलांना मंदिरात प्रवेशबंदी आहे.
हे ही वाचा:
त्या रेव्ह पार्टीमध्ये होता एका बड्या नेत्याचा मुलगा?
आर्यन खानचे व्हॉट्सअप चॅट आले समोर
‘हा’ अवलिया बेटावर तब्बल ३२ वर्षे एकटाच राहत होता… वाचा सविस्तर
धार्मिक स्थळांमध्ये कोणाला किती संख्यने प्रवेश द्यावा हा निर्णय त्या संस्थेवर अवलंबून आहे. फेरीवाले व दुकानदार या ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक असल्याचेही नियमामध्ये आहे. मुंबादेवी मंदिरामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी आनलाईन नोंदणीचा पर्याय मंदिर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला आहे. मंदिराजवळ थर्मल तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करताना दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे गरजेचे आहे अशांनाच मंदिरात प्रवेश मिळणार आहे. सिद्धिविनायक मंदिरात प्रशासनाच्या वतीने रोज आनलाईन दर्शन व्यवस्था करण्यात आली आहे.