श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

मंदिराच्या बांधकामाचे फोटो आले समोर

श्रीराम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण

उत्तर प्रदेशात शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या शहर ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी आणि हिंदू धर्मीयांसाठी तीर्थस्थान आहे. या अयोध्येमध्ये सध्या प्रभू श्री रामांच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. २०२० साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराच्या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर हे मंदिर आकार घेतं आहे. या मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मंदिराचे फोटो समोर आले आहेत.

श्री राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या १५ ते २४ जानेवारीदरम्यान मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ही प्रतिष्ठापणा करण्याचं उद्दिष्ट आहे. पाच वर्षांच्या बालकाच्या रुपातील श्रीरामांची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुले होणार आहे.

यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तर डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम कामे पूर्ण केली जाणार आहेत. मंदिराच्या तळ मजल्यावर मूर्ती स्थापन केल्या जातील तर दुसऱ्या मजल्यावर कोणतीही मूर्ती नसणार आहे, असं चंपत राय यांनी स्पष्ट केलं आहे. मंदिराचे गर्भगृह अशा प्रकारे बांधण्यात आलं आहे की, पहिल्या चैत्र राम नवमीला सूर्याची किरणं थेट प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर पडतील. तसेच, एका वेळी ४०० लोक श्रीरामांचं दर्शन घेऊ शकतील.

हे ही वाचा:

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला धावला ‘लालबागचा राजा’

मणिपूरमधील भयंकर व्हिडिओप्रकरणी चौघांना अटक

इर्शाळवाडीमध्ये बचावकार्याला सुरुवात; ५० ते ६० जण अजूनही ढिगाऱ्याखाली

शांतता राखा… मणिपूरमधील वेदनादायी घटनांनंतर आवाहन

जवळपास शंभर एकर परिसरावर उभारण्यात येणारं हे राममंदिर जमिनीपासून २५ ते ३० फूट उंचावर आहे. या जागेच्या खाली खोल पाया घालण्यात आला आहे. कमीत कमी हजार वर्ष तरी या मंदिराच्या बांधकामाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही, असा दावा करण्यात आला आहे. मंदिराच्या खांबावर मूर्ती कोरण्याचे कामही जोमाने सुरू आहे. गर्भगृहामध्ये सहा पांढऱ्या संगमरवराचे खांब उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक खांबावर तीन भाग असणार आहेत. याच्या वरच्या भागात ८ ते १२ मूर्ती, मधल्या भागात ४ ते ८ मूर्ती आणि खालच्या भागात ४ ते ६ मूर्ती असणार आहेत.

Exit mobile version