त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या वादाच्या तपासाचा एसआयटी अहवाल एका महिन्यात येणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान परिषदेत दिली माहिती  

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या वादाच्या तपासाचा एसआयटी अहवाल एका महिन्यात येणार

काही दिवसांपूर्वी नाशिकचे त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरण चर्चेत आले होते. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य केले. एसआयटीकडून या प्रकरणाचा एका महिन्यात अहवाल मागण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

विधानपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकाराविषयी प्रश्न उपस्थित केला. तसेच, नेमण्यात आलेल्या एसआयटीकडून अहवाल कधी मिळणार? यासंदर्भातही प्रश्न विचारला. यावर भूमिका मांडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणातील तपासाच्या सध्याच्या स्थितीची माहिती दिली.

देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना म्हटले की, “अशी परंपरा आहे का? हाच वादाचा भाग आहे. काही लोक म्हणतात ती आहे, काही म्हणतात अशी कोणतीही परंपरा नाही. २०२२ मध्ये ही मिरवणूक ते दरवाजातून आत घेऊन गेले. तिथे सेल्फी काढत होते, शूटिंग करत होते. याचे व्हिडीओ फूटेजही उपलब्ध आहे. इथे प्रश्न हा आहे की मंदिराच्या ट्रस्टींनी तक्रार केली आणि सांगितलं की ‘अशी कोणतीही परंपरा नाही, हा आमच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे’. त्यानंतर तक्रार दाखल करून घेण्यात आली. दोन्ही बाजूची बैठक झाली. त्यात तिथे जाणाऱ्या लोकांनी क्षमा मागितली आहे. त्यामुळे आता तिथे शांतता आहे”, असं फडणवीस म्हणाले.

तसेच अजून एसआयटीचा अहवाल आलेला नसून ज्यांच्याविरोओधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांना सीआरपीसी ४१ नुसार नोटीस देण्यात आलेली आहे. त्याची पुढची चौकशी चाललेली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

“त्र्यंबकेश्वर मंदिराच्या ट्रस्टींना धर्मादाय आयुक्तांनी नियुक्त केले आहे. त्यात सरकारी अधिकारीही आहेत. त्यांनी एखादी तक्रार दिली, तर त्याची दखल घेणं हे सरकारचे काम आहे. प्रथा-परंपरेच्या नावाखाली गोंधळ नाही घालता येणार. सगळ्यांनी एकमेकांच्या धर्माप्रती श्रद्धा ठेवावी. तरच संविधानाने दिलेल्या अधिकारांचं व्यवस्थित पालन केलं असं होईल. या प्रकरणाची चौकशी चालू असून तिथे पूर्णपणे शांतता आहे. महिन्याभरात एसआयटीच्या चौकशीचा अहवाल मागवण्यात येईल”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

हे ही वाचा:
चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी
स्पेनमध्ये ५० वर्षांनी उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांची पाटी कोरी, १८ जणांचे पथक जाणार
‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी
प्रकरण काय?
काही मुस्लीम धर्मीयांनी संदल मिरवणुकीदरम्यान नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला. यासंदर्भातले काही व्हिडीओही व्हायरल झाले होते. संदल मिरवणुकीदरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप देऊन नंतर ही मिरवणूक पुढे निघते, अशी प्रथा असल्याचा दावा नंतर करण्यात आला. याबाबत नंतर मिरवणूक काढणाऱ्या व्यक्तींनी “कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता”, असं म्हणत दिलगिरीही व्यक्त केली.
Exit mobile version