छत्रपती संभाजी नगरमधील पैठण तालुक्यातील एका खाजगी शाळेकडून विद्यार्थ्यांना अजब निर्णय लागू केल्याने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी टिळा, गंध लावून शाळेत न येण्याच्या सूचना दिल्याने खळबळ उडाली. यासंबंधीचे लेखी पत्र पालकांना पाठवण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात मराठा क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेत शाळा प्रशासनाला जाब विचरला. अखेर शाळेच्या मुख्याध्यापकांनी माफीनामा लिहून दिल्याने हा विषय मिटला.
पैठणच्या बिडकीन गावात महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल असून प्री प्रायमरीपासून ते जुनिअर कॉलेजपर्यंतचे वर्ग शाळेत भरवले जातात. दरम्यान, मंगळवार, २५ जुलै रोजी शाळा प्रशासनाकडून पालकांना एक पत्र पाठवण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही सूचना वाचून पालकांच्या भुवया उंचावल्या. विद्यार्थ्यांना विशेष म्हणजे मुलांना कपाळावर कोणत्याही प्रकारचा टिका, रंग, गंध लावून शाळेत पाठवू नये. तसेच हातात, कडे, दोरे बांधून पाठवू नये. विद्यार्थ्यांच्या कानात कोणत्याही प्रकारच्या बाळया नसाव्यात, अशा सूचना करण्यात आल्या होत्या.
यावरून मराठा क्रांती मोर्च्याचा समन्वयकांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, पालकांसह मराठा क्रांती मोर्च्याचे कार्यकर्ते बुधवार, २६ जुलै रोजी थेट शाळेत पोहचले. यावेळी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक आणि शाळा प्रशासनाला त्यांनी जाब विचारला. मात्र, असे कोणतेही नियम विद्यार्थ्यांना बंधनकारक केले नसून, फक्त त्याबाबत आवाहन केल्याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली. तर, शाळा प्रशासनाने काढलेलं पत्र मागे घेण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा आणि पालकांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षतेसाठी काँग्रेस दावा करण्याची शक्यता
उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर
राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राला अंतिम विजेतेपद
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास
शाळेच्या निर्णयावर पालकांनी नाराजी व्यक्त केली असून अनेक पालकांनी शाळेत जाऊन याबाबत विचारणा केली. तसेच मुलांनी गंध लावल्याने शाळेला काय अडचण आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. तसेच ही आपली संस्कृती असून, याला शाळेचा विरोध कशासाठी असा सवाल शाळेच्या शिक्षकांना पालकांनी विचारला. मात्र, पत्रात फक्त सूचना करण्यात आल्या असून, त्या बंधनकारक नसल्याचं शाळेतील शिक्षकांनी सांगितले आहे.