काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांवरील हिंसाचार आणि त्यांच्या पलायनाच्या वेदना मांडणारा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ याविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. तर आज चित्रपटाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आणि हा चित्रपट ११ मार्चला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
इंतेझार हुसैन सय्यद नावाच्या व्यक्तीने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या चित्रपटामुळे एका विशिष्ट धर्माच्या लोकांविरोधात रोष निर्माण होईल, असे सय्यद यांचे म्हणणे होते.
या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एमएस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यादरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, याचिकाकर्त्याला संपूर्ण चित्रपटावर नाही तर चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप आहे. कारण त्यामुळे एका विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. नुकतेच चित्रपटाच्या ट्रेलरमधून आक्षेपार्ह दृश्यांची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सय्यद यांनी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांच्या मते चित्रपटातील काही सीन्स त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करतात. चित्रपटातील दृश्ये आणि संवाद भेदभाव करणारे आणि बदनामीकारक आहेत. असे मत सय्यद यांचे होते.
चित्रपट निर्मात्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील रवी कदम यांनीही याबाबत मत मांडले आहे. ते म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाने नोव्हेंबर २०२१ रोजी प्रमाणपत्र जारी केले होते. त्यांनतर याचिकेत आणि सेन्सॉर बोर्डाच्या प्रमाणपत्रात वेळेचे खूप अंतर आहे. याचिकाकर्त्याने विलंबाने याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणाशी संबंधित दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, याचिकाकर्त्याला हवे असल्यास माहितीच्या अधिकाराखाली चित्रपटाच्या प्रमाणपत्राची माहिती मिळू शकली असती. पण त्याने तसे केले नाही. आणि थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे खंडपीठाने याचिका फेटाळून लावली आहे.
हे ही वाचा:
RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड
अनिल परबांच्या सीएच्या घरीही आयकर विभागाचे छापे
महिलांवर अत्याचार करणाऱ्या तालिबानकडून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!
विरोधकांना अडकवण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सरकारी’ कट!
विवेक अग्निहोत्री या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर चित्रपट अभिनेते अनुपन खेर आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह इतर प्रसिद्ध व्यक्तींनी चित्रपटात काम केले आहे.