देशासह राज्यभरात मराठी नववर्षाच्या आणि साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याचा सर्वत्र उत्साह पहायला मिळत आहे. यानिमित्त मुंबईतील गिरगाव, डोंबिवली, पुणे, नागपूर येथे भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. काही ठिकाणच्या शोभायात्रेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. त्यांनी जनतेला गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईतील गिरगाव आणि मुंबई नजीकच्या डोंबिवलीमध्ये दरवर्षी भव्य शोभा यात्रेचे आयोजन केले जाते. लहान मुलांपासून ते अगदी ज्येष्ठांपर्यंत सर्व या यात्रेत सहभागी होत असतात. यंदाची या यात्रांमध्ये नऊवारी साड्यांसह नाकात नथ, केसात गजरा, डोक्यावर रंगबिरंगी फेटे, डोळ्यावर गॉगल आणि बुलेटवर स्वार होऊन महिला आणि तरुणी या शोभायात्रेत मोठ्या उत्साहानं सहभागी झाल्या आहेत. तर, पुरुष मंडळीही पारंपारिक कुर्ता पायजमा असा वेश परिधान करुन ढोल-ताशांच्या गजरात या शोभा यात्रांमध्ये उपस्थित आहेत.
हे ही वाचा:
हिंदू तरुणाला इस्लाम धर्म स्वीकारून कलमा वाचायला लावला!
निमिष मुळे, झारा बक्षी सर्वोत्तम जलतरणपटू
‘मी गोमांस खात नाही…गर्व आहे मला हिंदू असल्याचा’!
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीसुद्धा ठाण्यात गुढी पाडव्यानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी प्राचीन अशा कौपिनेश्वर मंदिरातील पालखी सोहळ्यालाही उपस्थिती दाखविली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथे शोभा यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी ते म्हणाले की, “गुढी पाडवा हा आनंदाचा दिवस असतो. गेल्या काही दिवसांपासून या शोभायात्रांच्या माध्यमातून अत्यंत हर्षोउल्हासात हा सण साजरा होतो. प्रभू श्रीरामाचं मंदिर उभं राहिल्यानंतरचा हा पहिला पाडवा. त्यामुळं श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात निश्चितपणे विजयाची गुढी उभारली जाईल.”