‘सनातन धर्म : ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्सेस’ या विवान कारुळकर लिखित पुस्तकाला तुफान प्रतिसाद लाभल्यानंतर आणि देशविदेशातील अनेक मान्यवरांनी शाबासकीची थाप दिल्यानंतर या पुस्तकाच्या प्रवासाची नेमकी कहाणी, विचारप्रक्रिया विवानच्या मुलाखतीच्या रूपात प्रथमच लोकांसमोर येणार आहे. अवघ्या १६ वर्षी हे वेगळ्या विषयाला वाहिलेले पुस्तक लिहिणाऱ्या विवानच्या या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा टीझर नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यामुळे या पुस्तकाचा प्रवास नेमका कसा झाला, याविषयी लोकांचे कुतुहल या मुलाखतीमुळे नक्कीच शमणार आहे.
या मुलाखतीची चुणूक तुम्ही https://youtu.be/Tc-_3O_TMSU?si=smvOECjbnuNMERyL या लिंकवर जाऊन पाहू शकता.
विवान कारुळकरच्या या पुस्तकाच्या इंग्रजीसोबतच मराठी, हिंदीतही आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या सगळ्या आवृत्त्यांना तेवढाच चांगला प्रतिसाद लाभला आहे. देशविदेशात या पुस्तकाची खूप चर्चा झाली असून एवढ्या लहान वयात हे पुस्तक लिहिल्याबद्दल विवानचे कौतुक होत आहे.
कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती प्रशांत कारुळकर आणि प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांचे सुपुत्र विवान कारुळकर याच्या sanatan dharma : True source of all sciences या पुस्तकाच्या इंग्रजीतील आणि पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन अयोध्येतील राम मंदिरात झाले होते. राम मंदिर ट्रस्टचे चंपतराय यांनीही या पुस्तकाबद्दल कौतुकोद्गार काढले होते.
लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील रॉयल फॅमिलीकडून विवान याला त्याच्या कौतुकास्पद कामासाठी बॅज आणि नाणे देण्यात आले. विशेष म्हणजे ही नाणी अत्यंत दुर्मिळ आहेत. नुकत्याच झालेल्या ब्रिटनमधील विवानच्या या पुस्तकाची चर्चा होत होती. विद्यमान पंतप्रधान केअर स्ट्रॅमर यांनीही त्यावेळी विवानच्या पुस्तकाची तारीफ केली होती.
हे ही वाचा:
भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !
काँग्रेसची इकोसिस्टम खवळली, ‘सत्तेसाठी भुकेलेल्यांना गणेश पूजेची समस्या’
अल्पसंख्यांकांवरून भारतावर टिपण्णी करण्यापूर्वी इराणने स्वतःचे रेकॉर्ड्स बघावेत
नागालँड नागरिक हत्या प्रकरण: ३० जवानांवरील फौजदारी खटला रद्द
भारतीय सेनादलाने विवानला धार्मिक साहित्यात दिलेल्या योगदानाबद्दल पदक देऊन गौरविले होते. अवघ्या १७व्या वर्षी विवानने हा सन्मान प्राप्त केला आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात आले. ‘नासा’तील शास्त्रज्ञ मोहम्मद सैदुल अहसान व मोहम्मद सैफ आलम यांनीही विवानच्या पुस्तकाचे कौतुक केले. त्यांना हे पुस्तक प्रदान करण्यात आले. विवानचे पुस्तक स्वीत्झर्लंडमध्येही पोहोचले. स्वीत्झर्लंडच्या संसदीय समितीचे प्रमुख डॉ. निक गुग्गर यांनी विवानच्या या लेखनाचे कौतुक केले.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल यांनीही विवानचे या पुस्तकाबद्दल तोंडभरून कौतुक केले होते. जैन धर्माचे आचार्य महाश्रमणजी यांनीही पुस्तक पाहून विवानला भरपूर आशीर्वाद दिले. भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबईचे प्रभारी अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, सुशील कुल्हारी, राजस्थानचे आयकर खात्याचे प्रिन्सिपल डायरेक्टर सुधांशू शेखर झा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रवीण परदेशी, धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, धाराशिवचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जितो संघटनेचे प.पू. गुरुदेव नयपद्मसागरजी, कस्टम विभागाचे आयुक्त अस्लम हसन, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे खासगी सचिव एस. के. जाधव यांनीही विवानच्या या प्रयत्नाबद्दल त्याला शाबासकीची थाप दिली.
‘सनातन धर्म : सर्व विज्ञानाचा खरा स्रोत’ या मराठी आवृत्तीचे प्रकाशन लालबागचा राजाच्या दरबारात नुकतेच झाले. प्रशांत कारुळकर यांनी ९ सप्टेंबरला लालबागच्या राजाचे दर्शन घेतले, तेव्हा या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची प्रत लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण करण्यात आली होती.