बिहार दरभंगाच्या महापौरांनी होळीनिमित्त केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. शुक्रवारी होणाऱ्या होळी उत्सवादरम्यान दोन तासांचा ब्रेक घेण्याचे महापौर अंजुम आरा यांनी सुचवले आहे. यामुळे वाद निर्माण झाला आहे. रमजानच्या काळात शुक्रवारी नमाजसोबत होळी सण येतो.
महापौर अंजुम आरा यांनी एका निवेदनात, जुम्माची (शुक्रवारचा नमाज) वेळ बदलता येत नसल्याने होळी उत्सव दुपारी १२.३० ते दुपारी २ या वेळेत तात्पुरते थांबवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जुम्माचा वेळ वाढवता येत नाही, म्हणून होळीला दोन तासांचा ब्रेक असावा, असे निवेदनात त्यांनी म्हटले आहे. होळी साजरी करणाऱ्यांनी जुम्माच्या वेळी मशिदींपासून दोन तास अंतर ठेवावे, असे आवाहनही महापौरांनी केले आहे. होळी आणि रमजान याआधीही अनेकदा एकत्र साजरे झाले आहेत आणि जिल्ह्यात ते शांततेत साजरे झाले आहेत, असेही त्या पुढे म्हणाल्या.
आठवड्याच्या सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने शांतता समितीची बैठक घेतल्यानंतर हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. मुस्लिम बांधव पाळत असलेल्या रमजानमध्ये होळी शुक्रवारच्या नमाजसोबत येत असल्याने, बहुतेक शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, अंजुम आरा यांनी केलेल्या या वक्तव्यावर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
आमदार हरिभूषण ठाकूर यांनी त्यांना दहशतवादी मानसिकता असलेली महिला असे संबोधले. त्यांच्या प्रस्तावाला विरोध करताना ठाकूर म्हणाले की होळी साजरी करण्यावर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. ते म्हणाले की, “होळी साजरी करण्यावर कोणतीही बंदी असणार नाहीत. महापौर या गजवा-ए-हिंद मानसिकतेच्या महिला आहेत. आम्हाला त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी माहिती आहे. त्या होळी कशा थांबवू शकतात? होळी थांबणार नाही, एका मिनिटासाठीही थांबणार नाही,” असे ठाकूर यांनी ठामपणे सांगितले. काँग्रेस आणि राजदवर टीका करताना भाजपने म्हटले की, काही लोक संपूर्ण जगाचे इस्लामीकरण करू इच्छितात.
हे ही वाचा :
भारत-नेपाळ सीमेवर बेकायदेशीर घुसखोरी करताना बांगलादेशी नागरिकाला अटक!
डलमऊ भागात होळीला रंगाऐवजी चक्क शोक पाळला जातो
न्यूयॉर्कमध्ये फिलिस्तीन समर्थक आक्रमक
होळीच्या वेळी मुस्लिमांनी घरात राहावे असा सल्ला संभलचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अनुज कुमार चौधरी यांनी दिला होता. विरोधकांनी यावर टीका केली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे समर्थन केले. “रंगांचा सण वर्षातून फक्त एकदाच येतो, तर शुक्रवार (नमाजसाठी) वर्षातून ५२ वेळा येतो. आम्ही थेट संदेश दिला आहे की जेव्हा लोक होळी खेळतात आणि जर त्यांना (मुस्लिम) रंग त्यांच्यावर पडू नयेत असं वाटत असेल तर त्यांनी घरीच राहावे,” असे चौधरी म्हणाले होते.