वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद संकुलात सापडलेल्या शिवलिंगाच्या रक्षणासाठीच्या अर्जावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावर विचार करण्यासाठी खंडपीठही स्थापन करण्यात येणार आहे. शिवलिंगाच्या संरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने उद्या दुपारी ३ वाजता सुनावणी निश्चित केली आहे. याआधीच्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना मशिदीच्या आत ज्या ठिकाणी ‘शिवलिंग’ सापडले आहे ती सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले होते.
मुस्लिमांच्या नमाज पठणाच्या अधिकारावरही याचा परिणाम होऊ नये, असा आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा न्यायाधीशांना ज्ञानवापी मशिदीच्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद समितीच्या अर्जावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. समितीने म्हटले होते की, ज्ञानवापी हा खटला प्रार्थनास्थळे (विशेष तरतुदी) कायद्यांतर्गत दाखल करता येणार नाही.
हिंदू फिर्यादीतर्फे वकील विष्णू शंकर जैन यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. यानंतर भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी उद्या सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. अधिवक्ता आयुक्तांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आत सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने १७ मे रोजी दिलेला अंतरिम आदेश १२ नोव्हेंबरला संपत असल्याचे जैन यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, अंजुमन इंताजेमिया मस्जिद समितीने (जी मशिदीचे व्यवस्थापन करते) खटल्याच्या टिकावूपणाला आव्हान देणारा अर्ज फेटाळला आहे.
हे ही वाचा:
अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली
आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात
न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा यांच्या खंडपीठासमोर यापूर्वी सुनावणी झाली होती. ३१ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने १० नोव्हेंबरला या प्रकरणाची यादी करण्याचे मान्य केले होते. मात्र, त्याची नोंद करण्यात आली नाही. हे प्रकरण अंजुमन इंतजेमिया मस्जिद समितीने दाखल केलेल्या विशेष रजा याचिकेशी संबंधित आहे.