दिवाळी म्हणजे सर्वांसाठीचं आनंदाचा आणि उत्साहाचा सण. संबंध भारतात तर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातोच पण जगात जेथे जेथे भारतीय माणूस आहे, तेथे तेथे दिवाळीचा सण साजरा होत असतो. दिवाळी म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे आणि दु:खाकडून आनंदाकडे जाण्याचा सण आहे. दिवाळी शरद ॠतूमध्ये येते. ॠतू आणि सणांची अगदी योग्य सांगड घातलेली असून शरद ॠतू म्हणजे साधारण आक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे दिवस असतात. धान्य तयार होऊन घरात नवे धान्य आलेले असते.
आश्विन कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशीपासून नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि यमद्वितिया म्हणजे भाऊबीज अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. आज आहे नरकचतुर्दशी. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. याला यम चतुर्दशी आणि छोटी दिवाळी असंही म्हटलं जातं. या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते यामुळे दीर्घायुष्य आणि सौंदर्याचे वरदान मिळते.
पौराणिक कथेनुसार, या दिवसी भगवान श्रीकृष्णाने पत्नी सत्यभामाच्या मदतीने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. नरकासुराची माता भूदेवी. या भूमीदेवीचा मुलगा म्हणून याला भौमासुर असेही म्हणतात. या भौमासुराला आईकडून वैष्णवास्त मिळाले होते त्यामुळे तो खूप बलाढ्य झाला होता. पुढे त्याने गर्वाने लोकांना त्रास दिलाच पण देवांनाही त्रास द्यायला सुरुवात केली. या नरकासुराने वेगवेगळ्या राजांच्या सोळा हजार तरुण कन्या पळवून नेऊन आपल्या बंदिवासात ठेवल्या. नरकासुराच्या अत्याचाराला सर्व लोक कंटाळले होते. त्यामुळे इंद्राने श्रीकृष्णाची प्रार्थना केली आणि नरकासुराकडून या सर्वाची मुक्तता करण्याविषयी श्रीकृष्णाला सांगितले.
हे ही वाचा:
श्रीलंका क्रिकेट मंडळाचे सदस्यत्व आयसीसीकडून रद्द
मोठे उद्योगपती रोजगार कुठे देतात? छोटे व्यावसायिकच उद्योग देतात!
हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन मुंजाल यांच्या मालमत्तेवर टाच!
पाकिस्तानात दहशतवाद्याला ठोकले
नरकासुर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध सुरू झाल्यावर श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने नरकासुरावर प्रहार केला आणि त्याचे मस्तक उडविले. नरकासुर मृत झालेला पाहिल्यावर त्याची आई पृथ्वीमाता भूमिदेवी पुढे आली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि रत्नांनी चमकणारी दोन कुंडले, वैजयन्तीमाला वरुणाचे छत्र, महारत्न या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण केल्या. याच वेळी भूमीमातेने कृष्णाला नमस्कार करून त्याची प्रार्थना केली, की नरकासुराचा भगदत्त नावाचा मुलगा आहे. त्याला तू संभाळ. श्रीकृष्णाने त्याचे रक्षण केले. त्यानंतर सोळा हजार राजकन्यांना बंदिवासातून सोडवून द्वारकेला पाठविले. श्रीकृष्णाने नरकासुराला ज्या दिवशी मारले तो दिवस आश्विन कृष्ण चतुर्दशीचा होता. नरकासुराने आपली शेवटची इच्छा श्रीकृष्णाजवळ सांगितली आणि प्रार्थना केली. या दिवशी जो अभ्यंगस्नान करील त्याला नरकाची पीडा होणार नाही आणि या दिवशी लोकांना दिवे लावून विजयोत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाने त्याच्या दोनही मागण्या मान्य केल्या. नरकासुराच्या छळापासून लोक मुक्त झाले म्हणून आनंदोत्सवानिमित्त या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो.