औरंगजेबाच्या कबर नष्ट करा या मुद्द्यावरून गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध भागात आंदोलने सुरू आहेत. नागपुरातील महाल भागात मंगळवारी सकाळी आंदोलन करण्यात आले होते पण त्यानंतर संध्याकाळी बाहेरून काही लोक इथे आल्याचा दावा करण्यात येत असून त्यांनी इथे दगडफेक आणि जाळपोळ करत वातावरण चिघळवल्याचे म्हटले जात आहे. सध्या इथे मोठ्या प्रमाणात अटकसत्र पोलिसांनी हाती घेतले असून इमारती, घरे यात लपलेल्या समाजकंटकाना पोलीस शोधत आहेत.
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही संघटनांनी केलेल्या आंदोलनादरम्यान मुस्लिम समुदायाचा पवित्र ग्रंथ जाळल्याच्या अफवांमुळे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये दोन जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांकडून शांततेचे आवाहन
“नागपूरच्या महाल भागात दगडफेक आणि तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलीस प्रशासन परिस्थिती हाताळत आहे. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आम्ही सतत पोलिस प्रशासनाच्या संपर्कात आहोत आणि नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि सहकार्यशील शहर आहे. हीच नागपूरची परंपरा आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
हे ही वाचा:
गौण खनीज त्याच भूखंडावर वापरण्यासाठी रॉयल्टी माफ
गोरेगावात मोलकरणीवर लैंगिक अत्याचार करून मालक फरार
प्रभू राम जन्मभूमी ट्रस्टने गेल्या पाच वर्षात ४०० कोटींचा कर भरला!
महाल परिसरात दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ झाली. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवानही जखमी झाले. पोलिसांनी आता अटकसत्र सुरू केले असून अनेकांना ताब्यात घेतले आहे. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी नागपुरात आज सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी त्याला वेगळेच वळण मिळाले. दोन गटांमध्ये धुमश्चक्री उडाली. नागपुरातील महाल परिसरात दोन्ही गट आमनेसामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू केली. त्यानंतर वाहनांची जाळपोळ सुरू करण्यात आली. हल्लेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली. त्यात अनेक पोलीस जखमी झाले असून फायर ब्रिगेडचे चार जवानही जखमी झाले आहेत. आता समाजकंटकांना पकडण्याचं काम पोलिसांनी सुरू केलं आहे.
.
वाहनांची तोडफोड
समाजकंटकांनी यावेळी बेभान होऊन रस्त्यावरील दिसेल ती गाडी फोडण्यास सुरुवात केली. चारचाकी आणि दुचाकी वाहने पेटवण्यात आली. जेसीबी वाहनही पेटवून देण्यात आले. सध्या नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांततेचे आवाहन केले असून अफवांवर विश्वास ठेवू नये असेही या नेत्यांनी म्हटले आहे.