अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थी आता श्रीकृष्णाचे व्यवस्थापन धडे गिरवणार आहेत. विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेने पाच वर्षांचा बीबीए-एमबीए अभ्यासक्रम सुरू केला असून त्यात श्रीकृष्णाने शिकवलेले व्यवस्थापनाचे मंत्र विद्यार्थ्यांकडून गिरवून घेतले जाणार आहेत. त्यासाठी भगवद्गीता, रामायण, उपनिषदांसह चाणक्याच्या व्यवस्थापन नितीचा आधार घेतला जाणार आहे.
हे विद्यार्थी श्रीकृष्णाच्या व्यवस्थापकीय मंत्रांसह जेआरडी टाटा, अझिम प्रेमजी, धिरुभाई अंबानी, नारायण मूर्ती, सुनील मित्तल आणि बिर्ला यांच्यासारख्या देशातील आघाडीच्या उद्योजकांच्या स्मार्ट व्यवस्थापकीय निर्णयांचाही अभ्यास करतील. तसेच, कठीण परिस्थितीत आपला तोल ढळू न देण्यासाठी आणि शांत राहून परिस्थितीला तोंड देण्यासाठी या विद्यार्थ्यांना अष्टांग योगही शिकवला जाणार आहे.
हा अभ्यासक्रम गेल्याच महिन्यात सुरू झाला आहे. सध्या या अभ्यासक्रमात २६ विद्यार्थी आहेत. या संपूर्ण अभ्यासक्रमात १० सेमिस्टर असून त्यासाठी २२० क्रेडिट्स असतील. जर एखाद्या विद्यार्थ्याने पहिल्याच वर्षी अभ्यासक्रम सोडल्यास त्याला पहिल्या वर्षाचे प्रमाणपत्र दिले जाईल. दुसरे वर्ष पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रम सोडल्यास डिप्लोमाचे तर, तिसरे वर्ष पूर्ण करणाऱ्याला बीबीए आणि पाचवे वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला एमबीए डिग्री मिळणार आहे.
हे ही वाचा:
आसाममध्ये रंगणार ‘जाणता राजा’चे प्रयोग
रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!
दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स
‘भारतीय व्यवस्थापनाचे विचार आणि कार्ये’ या विषयात विद्यार्थ्यांना पारंपरिक अभ्यासासह अध्यात्म आणि व्यवस्थापन, सांस्कृतिक आचारसंहिता, मानवी मूल्ये आणि व्यवस्थापन, अष्टांग योग, जीवनाचा समग्र दृष्टिकोन आणि ध्यान आणि तणाव यांचे प्रशिक्षण दिले जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि स्टार्टअप मॅनेजमेंटचाही अभ्यासक्रमात ठळकपणे समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती अभ्यासक्रमाच्या समन्वयक शेफाली नंदन यांनी दिली.