शिर्डी संस्थानच्या नाण्यांचा ढीग ठरला, बँकांसाठी समस्येचा डोंगर!

बँकांच्या खात्यातील नाण्यांची रक्कम मोजली असता ११ कोटी

शिर्डी संस्थानच्या नाण्यांचा ढीग ठरला, बँकांसाठी समस्येचा डोंगर!

शिर्डीचे साईबाबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अनेक जाती, धर्मातील लोकांची साईबाबांवर श्रद्धा आहे. दरवर्षी लाखो भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले असताना दानधर्म करतात. यात सोने, चांदी तसेच रोख रकमेचे दानही प्राप्त होते. याची किंमत करोडोच्या घरात असते. मात्र आता हेच दान संस्थान आणि शिर्डीतील बँकाची डोकेदुखी ठरते आहे.

शिर्डी संस्थानाची वेगवेगळ्या राज्यात १३ बँक खाती आहेत त्याच्यापेक्षा डझनभर जास्त बँक खाती नाशिक जिल्ह्यात आहेत. प्रत्येक बँकेकडे दीड ते दोन कोटींची नाणी आजमितीला पडून असून नाण्यांच्या डोकेदुखीमुळे चार बँकांनी यापुढे संस्थानच्या ठेवी स्वीकारण्यास असमर्थता दाखवली आहे.

हे ही वाचा:

पायलटने चक्क मैत्रिणीला कॉकपिटमध्ये बोलावले, चौकशी सुरू

टीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पाकिस्तानात विकत आहे, विदेशी शस्त्रांच्या ‘फर्स्ट कॉपी’ अगदी स्वस्तात!

सावरकरांची बदनामी करण्याची काँग्रेसची मोहीम

सध्या सर्व बँकांच्या खात्यातील नाण्यांची रक्कम मोजली असता ११ कोटी इतकी आहे असे संस्थेने म्हटले. वर्षाकाठी संस्थानला साडेतीन कोटी रुपयांची नाणी प्राप्त होतात आणि ही नाणी स्वीकारण्यास बँकानी हात वर केले आहेत. शिर्डीमध्ये दर्शनाला दररोज हजारो भाविक येतात आणि आपल्या इच्छेनुसार दानही करतात. या दानामध्ये दानपेटीत येणाऱ्या सुट्या नाण्यांचा मोठा समावेश असतो.

साईसंस्थानच्या दानपेटीतील नाण्यांमुळे बँका मेटाकुटीला आल्या आहेत. साईबाबांच्या दानपेटीत दर आठवड्याला सरासरी सात लाख तर वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी जमा होतात. शिर्डीतील रामनवमी उत्‍सवाच्या काळात भाविकांनी साईचरणी कोट्यवधींचे दान प्राप्त झालं आहे. तीन दिवसात दोन लाखाहून अधिक भाविकांनी साई दर्शन घेतले. रामनवमी उत्सवाच्या तीन दिवसात साईबाबा संस्थानला एकूण चार कोटी नऊ लाख दान प्राप्त झालं आहे. यात दानपेटीत एक कोटी ८१ लाख ८२ हजार १३६ रुपये जमा झाले आहेत. तर देणगी काउंटरव्‍दारे ७६ लाख १८ हजार १४३ रुपये दान करण्यात आले आहेत.

त्याचबरोबर अनेक भाविक हे ऑनलाईन देणगी देत असतात. यात डेबीट, क्रेडीट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, डीडी आणि मनी ऑर्डर आदींद्वारे एक कोटी ४१ लाख ५२ हजार ८१२ रुपयांचं दान प्राप्त झालं आहे. यासोबत ८ लाख ६४ हजारांचे १७१ ग्रॅम सोने तर १ लाख २१ हजार ८१३ रुपये किमतीची २ किलो ७१३ ग्रॅम चांदीही अर्पण करण्यात आली आहे. या दानाव्‍यतिरिक्‍त उत्‍सव काळात सशुल्‍क तसेच ऑनलाईन पासेसव्‍दारे एकू ६१ लाख ४३ हजार ८०० रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाले आहे.

दानपेटीत येणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थानपुढे तसेच बँकापुढे देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिर्डी शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील तसेच परजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये खाते उघडण्याचा विचार संस्थानकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. यातून मार्ग निघावा यासाठी थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार असल्याचं संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version