कुर्ल्यामध्ये श्री रामाच्या जत्रेला सुरुवात

मुंबई उपनगरातील सर्वात जुन्या मानाच्या यात्रेला सुरुवात

कुर्ल्यामध्ये श्री रामाच्या जत्रेला सुरुवात

मुंबई उपनगरातील सर्वात जुन्या पुरातन मंदिरापैकी असणाऱ्या श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात चंपाषष्ठी उत्सव व श्री रामाच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. कुर्ल्याचे ग्रामदैवत म्हणून सुद्धा श्री सर्वेश्वर महादेव मंदिराला ओळखले जाते. तर या मंदिराच्या परिसरात गेल्या १३९ वर्षापासून श्री रामाची पारंपरिक जत्रा भरवली जात आहे. २९ नोव्हेंबर रोजी या मंदिरात चंपाषष्ठी पालखी सोहळा संपन्न झाला. मात्र कूर्लेकर या पालखीला रामाची पालखी किंवा रामाची जत्रा असे सुद्धा म्हणतात. तर ही जत्रा पुढे ३० नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दत्त जयंती पर्यत ही जत्रा चालणार आहे.

दरम्यान, मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनासारख्या महाभयंकर रोगामुळे सर्वेश्वर मंदिराचा उत्सव मोजक्या गामस्थांच्या उपस्थितीत पार पडला होता. यंदा मात्र कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत संपूर्ण क्षमतेने यात्रा भरवली गेली आहे. साधारणतः या यात्रेचा प्रारंभ मार्गाशीष महिन्याच्या सुरुवातीला चंपाषष्ठी उत्सव झाल्यानंतर या जत्रेची सुरुवात होते. यात्रेमध्ये पारंपरिक मिठाई व खेळण्यांची दुकाने लावली जातात व मनोरंजनात्मक साधने ही इथे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे सांस्कृतिक परंपरेचे जतन करत कुस्ती ही खेळवली जाते. पूर्वी आठ दिवस चालणारी ही कुस्ती स्पर्धा आता मात्र एका दिवसातच ‘डाव’ आटोपावा लागतो. कुस्ती स्पर्धा ही या यात्रेचे खास आकर्षण असून काल रात्री पर्यत रंगलेल्या कुस्तीच्या डावात ३०० पैलवानांनी सहभाग घेतला होता. अशी माहिती आयोजक संजय घोणे, विश्वास कांबळे, चंद्रकांत सावंत यांनी दिली.

कुर्ला पश्चिमेला ही यात्रा दरवर्षी भरते. साधारणतः सर्वेश्वर महादेव देवालय ट्रस्ट ही १८८३ च्या दरम्यान असली तरी या प्राचीन मंदिराचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत सुद्धा आढळतो. त्याचप्रमाणे कुठे तरी रामराया आणि या मंदिराचा संबंध आला असावा. तसेच या सगळ्या तर्कातून वस्तुनिष्ठ साक्षी पुरावे गोळा करण्याचे काम सध्या चालू असल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले. तसेच लोकबोली आणि परंपरेतून हा संबंध येताच इतिहासाच्या आधारावर हा संबंध सिद्ध करू शकलो तर ऐतिहासिक शहर आणि ऐतिहासिक मंदिर असा दाखला भविष्यात मिळाला तर नवल वाटायला नको.

हे ही वाचा : 

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरु

प्रसिद्ध पत्रकार रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीला रामराम

ISIS चा म्होरक्या युद्धात ठार, नव्या म्होरक्याचं नाव घोषित

अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरूच; मदरशातील स्फोटाने घेतले १८ बळी

पूर्वी उपनगरीय मध्य रेल्वे मार्ग अस्तित्वात नव्हती तेव्हापासून सर्वेश्वर महादेवाची ही पालखी कुर्ला बैलबाजार, सायन चुनाभट्टी करत पुन्हा सर्वेश्वर मंदिरात येवून ग्राम प्रदक्षिणा पूर्ण व्हायची, असा उल्लेख आढळतो. तर पूर्वी कुर्ल्यामध्ये ‘स्वदेशी’ आणि ‘स्वान’ नावाच्या दोन कापड गिरण्या होत्या. गिरणीमधील कर्मचाऱ्याना पालखीत सहभागी होण्यासाठी अर्धा दिवस सुट्टी ही दिली जात असे. तसेच या ऐतिहासिक सोहळ्यात सामील होवून जत्रेची शोभा वाढवावी, असे अवाहान सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version