आषाढ अमावस्येनंतर श्रावणाला प्रारंभ होतो. या महिन्यात महादेवाच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व असते. या महिन्याला व्रतांचा, सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिना शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र महिना मानला जातो. ९ ऑगस्टपासून या श्रावण महिन्याला प्रारंभ होतो आहे.
आषाढ अमावस्या किंवा दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होत असते. घरातील दिवे, समया, निरांजने, लामणदिवे घासून पुसून लख्ख करून ते प्रज्वलित करण्याचा हा दिवस असतो. सर्व दिव्यांमध्ये तेल वात घालून प्रज्वलित केले जातात. कणकेचे उकडलेले गोड दिवेही बनवले जातात. या दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्याची सुरुवात आणि सांगता सोमवारीच होत असते.
हे ही वाचा:
‘मुख्यमंत्र्यांच्या घोषणेआधीच उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; ही तर श्रेयाची लढाई’
नॉटिंगहॅम कसोटी: भारताची स्थिती चांगली…पण वतावरण खराब
का झाली न्यायनिवाडा करणाऱ्यांचीच अवस्था दयनीय?
पंतप्रधानांच्या हस्ते होणार सुमारे ९ कोटी शेतकऱ्यांचा ‘सन्मान’
पहिला श्रावण सोमवार ९ ऑगस्ट २०२१ रोजी आहे. पहिल्या श्रावण सोमवारपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात होते. पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ शिवामूठ म्हणून महादेवाला अर्पण केला जातो. श्रावणी सोमवारी शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेकालाही विशेष महत्व असते.
श्रावणात सर्वसाधारणपणे सामीष आहाराला फाटा दिला जातो. मांसाहार या काळात शरीराला बाधक असतो, त्यामुळे शाकाहाराला पसंती दिली जाते. भाज्या, फळभाज्या, फळे आदि शाकाहारावर प्रामुख्याने भर असतो. पालेभाज्या, रानभाज्या यांचा आस्वाद घेतला जातो. पूर्वी शाळांना श्रावणी सोमवारी सुट्टी दिली जात असे. तर शनिवारी अर्धा दिवस शाळा असे. त्यामुळे एक वेगळी मजा अनुभवायला मिळत असे. आता शाळांमध्ये तशी सूट दिली जात नसली तरी श्रावणातली ती मजा मात्र अजूनही कायम आहे.
यंदा पहिला श्रावण सोमवार ९ ऑगस्टला येत असून त्यानंतर १६ ऑगस्ट, २३ ऑगस्ट, ३० ऑगस्ट आणि ६ सप्टेंबर असे श्रावणी सोमवार असतील.