आपल्या ओघवत्या वाणीने आणि लेखणीने छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र अवघ्या महाराष्ट्रासमोर ठेवणारे महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. गेले दोन आठवडे ते दीनानाथ रुग्णालयात दाखल आहेत. रविवारी त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तियांकडून मिळाली.
बाबासाहेबांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे यासंदर्भात अधिक माहिती काही कालावधीनंतर देणार आहेत. नुकतीच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली तेव्हा त्यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेऊन अभिष्टचिंतन केले होते.
हे ही वाचा:
त्रिपुरात आग लागलीच नाही, पण महाराष्ट्रात धुर उडाला
‘हे’ आहे त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील आंदोलनांचे कनेक्शन
‘हे मायावी बसतात दुसऱ्याबरोबर आणि सरकार बनवतात तिसऱ्याबरोबर’
किवी विरुद्ध कांगारू सामन्यात कोणाची होणार सरशी?
२६ ऑक्टोबरला सकाळी ते उठले असता त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही पहिले दोन दिवस ते व्यवस्थित बोलत होते. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती खालावत गेली.
बाबासाहेबांनी ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक असे प्रदीर्घ लेखन केले आहे. ललित कादंबरी, नाट्यलेखन, जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. २०१५मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण, तर २०१९मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जाणता राजा नाटकाचे त्यांनी १२५० प्रयोग केले.