गुमतारा किल्ल्यावर प्रवेशद्वार बसवून साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन

गुमतारा किल्ल्यावर प्रवेशद्वार बसवून साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नुकताच तिथीनुसार ठाणे जिल्ह्यातील ता.भिवंडी मधील गुमतारा किल्ल्यावरील संवर्धित झालेल्या प्रवेशद्वार पूजन करून करण्यात आला. यावेळी अनेक शिवभक्तांनी महाराजांना अभिवादन केले.

यावेळी किल्ल्यावर तटबंदी,बुरुज आणि प्रवेशद्वारास फुले, तोरणाची सजावट करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करण्यात आला. प्रवेशद्वाराखालील राजमार्ग दुरुस्त करण्यात आला. इतिहास आणि किल्ले संवर्धनपर विशेष परिसंवाद चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

प्रवेशद्वार संवर्धन- गडाचे मुख्य प्रवेशद्वार हा मोठ मोठ्या दगडांनी गाडले गेले होते. फक्त २.३ फूट एवढाच भाग आणि प्रवेशद्वाराचे कमानी स्तंभ दिसत होते. संस्थेच्या भिवंडी विभागातर्फे दुर्गसंवर्धन मोहिमा राबवून हे काम अत्यंत कमी कालावधीत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. या कामानंतर प्रवेशद्वार ९.२फूट उंच,१४ फुट लांब आणि ६ फुट रुंद, एवढे मोकळे झाले तसेच पूर्वी खडकात खोदलेल्या १० पायऱ्या आणि बुरुज दिसू लागला.

पर्यटकांच्या माहितीसाठी संस्थेमार्फत इतिहास फलक,सूचना फलक,दिशा दर्शक /नकाशा आणि दुर्ग अवशेष माहिती फलक लावून आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी संपर्क देण्यात आले आहेत.

या किल्ल्याचा इतिहास पाहायचा झाला तर किल्ल्यास घोटवड,दुगाड, गोतारा व गुमतारा यांना नावाने संबोधले जाते. किल्ल्यावरील पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामावरून हा किल्ला प्राचीन व मध्ययुगीन कालखंडाची साक्ष देतो. किल्ल्याच्या परिसराचा उल्लेख इ.स.१६८९ मध्ये आढळतो. छत्रपती संभाजी महाराज पकडले गेल्याचे समजताच मुघल सुभेदार मात्तबरखान नाशिक कडून माहुलीवर चालून गेला. दोन तीन महिन्यात नाना युक्त्या करून माहुली,भिवंडी,दुगाड आणि कल्याण ही ठाणी त्याने कब्जात आणली.

वसई मोहिमेवर पेशव्यांनी पाठविलेली फौज माहुलीच्या रानात दबा धरून बसली होती. २४ मार्च १७३७ रोजी ती फौज घोटवड रानात आली होती. पाण्याच्या मारामारीमुळे दोनचार सैनिक मृत्यु पावले होते. पुढे या सैन्यांनी तुंगार पासून राजवली येथे मुक्काम करून वसई मोहिमेतील पहिला मोर्चा बहाद्दरपुरा येथे लावला.किल्याच्या पायथ्याशी असलेल्या दुगाड येथे १२ ते १ डिसेंबर १७८० मध्ये कर्नल हर्टेल यांच्या सोबत झालेल्या लढाईत मराठा सरदार रामचंद्र गणेश हरी यांना वीरमरण आले. इ.स.१८१८ मध्ये इंग्रजांनी या किल्ल्याचा पूर्ण ताबा घेतला. हा किल्ला १९९४ फुट / (५८५ मीटर) एवढ्या उंचीवर असून प्रसिद्ध वज्रेश्वरीदेवी मंदिरापासून ४ किमी अंतरावर आहे.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार

आईकडून मतिमंद मुलीची हत्या

शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येचा बदला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

‘या’ कारणासाठी पंतप्रधान मोदी जाणार गांधीनगरला

 

संस्थेच्या दुर्गसंवर्धन कार्याने पुन्हा एकदा ३५० वर्षानंतर या वास्तू पर्यटक आणि दुर्गप्रेमी यांना पहावयास मिळत आहे.

संस्थेच्या भिवंडी,मुंबई ठाणे,शहापूर या विभागांनी सहभाग घेतला.अशी माहिती भिवंडी विभाचे सदस्य अक्षय पाटील व सागर पाटील यांनी दिली. सदरच्या मोहिमेदरम्यान संस्थेचे कार्याध्यक्ष मा.आमदार श्री.संजय केळकर यांचे मार्गदर्शन सर्व सदस्यांना लाभत होते.सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धनाचे कार्य गेल्या १४ वर्षापासून करत आहे. संस्थेची स्थापना श्रमिक गोजमगुंडे यांनी केली आहे.शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात या कार्यात सहभाग घ्यावा असे आव्हान भिवंडी विभागाचे सदस्य रोशन पाटील यांनी केले.

Exit mobile version