भाईंदर पूर्वेला असलेल्या साईबाबा नगर, नवघर रोड येथे असलेले एक छोटे शिवमंदिर पालिकेकडून हटविण्यात आल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. स्थानिक राजकारणातूनच हे मंदिर हटविण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
यासंदर्भात या मंदिराच्या उभारणीत महत्त्वाचा हातभार असलेले हर्षद पुरळकर म्हणतात की, हे
मंदिर तीन-चार वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते आणि लोकांची खूप आस्थाही होते. या भागात एक शिवमंदिर असावे, अशी लोकांची मागणी असल्यामुळे तिथे छोटे शिवमंदिर उभे करण्यात आले. या भागातील मैदानाच्या एका बाजुला हे मंदिर होते. त्याचा कुणाला अडसरही होत नव्हता. पुरळकर म्हणाले की, मी या विभागात सामाजिक कार्य करत असतो. काही दिवसांपूर्वी छठ पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. स्थानिक उत्तर भारतीय व बिहारी रहिवाशांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. हा वाढता प्रतिसाद कुणाला तरी खुपला आहे. विशेष म्हणजे छठपुजेला आम्ही भाजपाच्या मिरा भाईंदरच्या जिल्हाध्यक्षांना बोलावले होते. कदाचित स्थानिक नगरसेवकाला डावलल्यामुळे त्यांचा राग असावा. त्यातूनच या मंदिरावर ही कारवाई करण्यात आली असावी. या मंदिराच्या माध्यमातून आम्ही एकत्र येतोय हेदेखील पटत नसावे.
पुरळकर म्हणाले की, या कारवाईची कुणकुण मला लागली होती. मग पालिका उपायुक्तांना भेटून त्यासंदर्भात विचारणा केल्यावर मंदिर हटवावे लागेल असे त्यांनी सांगितले. निवडणुकीला आठ महिने राहिले आहेत. तसेच आता वातावरण बदलले आहे. तेव्हा लोक मला साथ देत आहेत, हे पाहून त्याचा राग मंदिरावर काढण्यात आला आहे.
हे ही वाचा:
कसली स्टँड अप कॉमेडी, हा तर अजेंडा
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले
‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले
दहशतवादी समजून गोळीबार, ११ मजूर ठार
येथे मोकळी जागा होती आणि लोकांनाही वाटत होते की, तिथे शिवमंदिर व्हायला हवे. म्हणून आम्ही ते मंदिर बांधले. मंदिरासाठी खूप मोठे बांधकाम वगैरेही केलेले नव्हते. पण आता मंदिर हटविण्यासाठी मोठा फौजफाटा मागविण्यात आला आणि कारवाई केली गेली. त्यातील शिवलिंग त्यांनी हलविले आणि त्याचे त्यांनी विसर्जन केले. या कारवाईमुळे लोकांमध्ये नाराजी आहे. लोकांची आस्था होती. ज्येष्ठ नागरीक, महिला, मुले दर्शनासाठी या मंदिरात येत होती. भाजी मार्केटसाठी तेथील मॅनग्रोव्हज तोडून जागा बनविली जाते, पण छोट्या मंदिराला मात्र जागा देत नाहीत. स्थानिक नगरसेवकांच्या आदेशानुसार हे मंदिर हटविले गेले आहे.