नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी देवीचे मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. महाराष्ट्रातील श्रध्दाळूंचे हे जागृत दैवत नाशिकपासून ५५ कि.मी. अंतरावर आहे. नांदूरी गांव सप्तश्रृंग गडाच्या पायथ्याशी आहे. नांदूरी गावात पोहोचल्यानंतर गडावर जाताना रस्ता घाटमाथ्याचा आणि वळणावळणाचा आहे. हा रस्ता जवळजवळ ११ कि.मी. आहे. गड चढून जाण्यासाठी नांदुरीतून पायऱ्यांचा रस्ताही तुम्हाला खुणावत असतो.
सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण. सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरावरून या गडाला सप्तश्रृंगी म्हटले जाते. सप्तश्रृंगी गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा, शिवतीर्थ अशी पवित्र अनेक स्थळे आहेत. समुद्रसपाटीपासून गडाची उंची ४ हजार ५६९ फूट आहे. या गडाला ४७२ पायऱ्या आहेत. एवढ्या पायऱ्या चढून गेल्यानंतरही देवीच्या प्रसन्न दर्शनाने थकवा नष्ट होतो. हात नतमस्तक होऊन आपोआप जोडले जातात. दर पौर्णिमेला व नवरात्रात भविकांनी गड गजबजून जातो. चैत्र पौर्णिमेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविक देवीच्या दर्शनाला येतात. यावेळी मोठी जत्रा भरते. जत्रेचा आनंद भक्त लुटतात. देवीचा गाभारा ओटीचे खण, नारळ व साडयांनी भरून गेलेला असतो.
मंदिराची आख्यायिका
या गडावर महिषासुराचे मंदिर आहे. देवीने त्रिशुळाने महिषासुराच्या धडापासून शीर वेगळे केले. त्यामुळे पर्वताला मोठी भेग पडली. ती आजही दिसते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या ठिकाणी महिषासुराच्या शीराचे पूजन केले जाते. श्री राम आणि रावण यांच्या युद्धादरम्यान इंद्रजितच्या बाणामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला. यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमानाने द्रोणागिरी पर्वतच उचलून आणला. त्या डोंगराचा काही भाग जमिनीवर पडला, तो म्हणजे सप्तश्रृंगी असेही म्हटले जाते. या मंदिराचे राम-सीता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी दर्शन घेतल्याचा उल्लेख पुराणात आणि बखरीमध्ये आढळतो.
एका धनगराला दिसलेले मधमाशांचे पोळे काढण्यासाठी त्याने त्यात काठी खुपसली तेव्हा काठीला शेंदूर लागला. त्याने पोळे काढल्यानंतर तेथे देवीची मूर्ती सापडली, अशीही एक दंतकथा आहे.
सप्तश्रृंगी देवेची मूर्ती
ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून गिरिजा महानदी प्रकटली. तिचे रूप म्हणजे सप्तश्रृंगी. देवीची मूर्ती नऊ फूट उंच आहे. तिला १८ हात आहेत. मूर्ती शेंदुराने लिंपलेली आहे. १८ हातात वेगवेगळी शस्त्र आहेत. मूर्ती काहीशी झुकलेली आहे. त्याबाबतची कथाही आहे. गडाजवळच्या दरीजवळ मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करत होते. त्यांची प्रार्थना देवी ऐकत होती. तेव्हापासून प्रार्थना ऐकण्यासाठी झुकलेल्या अवस्थेतच देवीची मूर्ती असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
महिषासुराच्या वधासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश आणि इंद्राने आपापली आयुधे देवीला दिल्याचे म्हटले जाते. महिषासुराचा वध केल्यामुळे या देवीला महिषासूरमर्दिनी असेही म्हणतात. मंदिराच्या गाभाऱ्याला तीन दरवाजे आहेत. शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार. या दरवाजातून मातेचे दर्शन होते. चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते तर शारदीय नवरात्रात गंभीर.
देवीची पूजा आणि उत्सव
पहाटे पाच वाजता सप्तशृंगी देवीचे मंदिर उघडले जाते. सहा वाजता काकड आरती होते. आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते. या पूजेमध्ये मूर्तीला पंचामृत स्नान घातलं जातं. त्यानंतर देवीला पैठणी अथवा शालू नेसवला जातो. पानाचा विडा मुखी दिला जातो. पेढा आणि वेगवेगळी फळे याचा नैवेद्य दाखवला जातो. १२ वाजता महानैवेद्य आरती होते. सायंकाळी ७.३० वाजता शेजारती होते आणि नंतर मंदिराचे दरवाजे बंद होतात.
मंदिरावरील ध्वज
ध्वज महात्म्य चतुर्दशीला मध्यरात्री १२ वाजता भगवतीच्या देवळावर ध्वज फडकला जातो. ध्वज फडकवण्याचे काम कळवण तालुक्यातील एका गवळी घराण्याकडे आहे. ध्वज नेणारा कोठून, कसा जातो, एवढया उंचीवर ध्वज कसा लावतो व त्याचे नवे कोरे कपडे कसे फाटतात याचे रहस्य अजूनही उलगडलेले नाही. सप्तश्रृंगी मातेचा ध्वज नेहमी उत्तरेकडे फडकत राहतो.
शीतकडा
तीर्थाच्या पुढे एक प्रचंड दरी शीतकडा म्हणून उभी आहे. ती १ हजार ५०० फूट खोल आहे तर समुद्र सपाटीपासून ४ हजार ६३८ फूट उंच आहे. एका सवाष्णीने मला मुल होऊ दे भगवती, मी कडयावरून बैलगाडीत बसून उडी घेईन असा नवस देवीला केला होता. देवीच्या कृपेने तिला पुत्रप्राप्ती झाली. नवस पूर्ण झाल्यावर त्या स्त्रीने आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकडयावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजुनही शीतकडयावर पाहता येतात.
गडावर मंदिराशिवाय इतरही काही ठिकाणे आहेत. मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केलेला डोंगर व कोटीतीर्थ तेथेच आहे. याशिवाय पाण्याची बरीच कुंडे आहेत. पूर्वी १०८ कुंडे होती. मात्र आता त्यांतील बरीच बुजली आहेत. याशिवाय तांबुलतीर्थ, काजळतीर्थ व अंबालतीर्थ ही तीन महत्त्वाची कुंडे आहेत. तांबुलतीर्थाचे पाणी तांबडे आहे. देवीने विडा खाऊन थुंकला म्हणून हे पाणी तांबडे झाल्याची दंतकथा सांगितली जाते.
हे ही वाचा:
सिंधुदुर्ग चिपी विमानतळाला माजी खासदार बॅ. नाथ पै यांचे नाव
मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएफआय संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी
‘बुरखा घातला नाही म्हणून केलेली हिंदू तरुणीची हत्या हा लव्ह जिहादचा प्रकार’
सप्तश्रृंगी गडावर कसे पोहोचाल?
सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी नाशिकहून बसेस सुटतात. उत्सवाच्या काळात जादा एसटी बसेसची सोय करण्यात येते. गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बसची व्यवस्था आहे. घाटमाथ्यावर गाडी चालवण्याची सवय नसल्यास शक्यतो या बसेसचा उपयोग करा. रस्ता खडतर आहे. रेल्वेने नाशिक रोड येथे उतरून रस्त्यामार्गे ७५ किमीवर अंतरावर हे मंदिर आहे. नाशिक ते सप्तश्रृंगी मंदिर जवळजवळ ६५ कि.मी.आहे.