नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज

संत नामदेव महाराजांची जयंती

नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज

संत नामदेव महाराज म्हणजे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा असे म्हटले जाते. वारकरी सांप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण भारतभर आपल्या कार्यातून एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी केले. २६ ऑक्टोबर ही त्यांची जयंती त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

संत नामदेव महाराज यांचा जन्म २६ ऑक्टोबर १२७० रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या नरसीबामणी गावात छिपा नावाच्या शिंपी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट आणि आईचे नाव गोणाई देवी होते. त्यांचे कुटुंब हे विठ्ठलाचे परम भक्त होते. नामदेव महाराजांचा विवाह राधाबाईशी झाला आणि त्यांच्या मुलाचे नाव नारायण होते. विठ्ठलाच्या भक्तीचे वेड नामदेव महाराजांना लहानपणापासूनच होते. आपल्या भक्तीने प्रत्यक्षात विठ्ठलाला प्रसन्न करणारे आणि किर्तनकलेमुळे प्रसंगी पांडुरंगाला ठेका धरायला लावणारी किर्ती होती. त्यांचे काम, किर्तन आणि समाजप्रबोधन हे महाराष्ट्रापुरतेच मर्यादित होते असे नाही. तर पंजाबमध्येही नामदेव महाराजांचे नाव आहे.

‘नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हाच संकल्प आयुष्यभर जपत भक्तिमार्ग सर्वाना खुला असतो हे जाणणारे व स्वत: या मार्गाचा प्रसार करणारे संत नामदेव महाराज हे संपूर्ण जीवन विठ्ठल भक्तीमध्ये रमलेले होते. १२९१ साली नामदेव महाराजांची भेट ज्ञानेश्वर माहाराजांशी झाली. गुरुशिवाय आपली भक्ती अधूरीच आहे अशी जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचर यांच्याकडून उपदेश घेत त्यांचे शिष्यत्व स्विकारले.

त्यानंतर नामदेव महाराज उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात भागवत धर्मप्रचारासाठी गेले. तब्बल ५३ वर्षे त्यांनी भारतात धर्मप्रसार केला.उत्तर भारतातून तीर्थयात्रा करत नामदेव महाराज हरिद्वारहून दिल्ली आणि तिथून पंजाबमधील भूतविंड, मर्डी, भट्टीवाल असा प्रवास करत घुमानमध्ये पोहोचले. त्यानंतर ते जवळपास वीस वर्षं इथंच राहिले. भट्टिवाल गावात त्यावेळी पाण्याचा प्रचंड दुष्काळ होता. पाण्यासाठी लोकांचे हाल होत होते. नामदेव महाराजांनी तलाव, विहिरी पाडण्यासाठी लोकांना उद्युक्त केले आणि पाण्याचा दुष्काळ संपवला. भट्टिवाल या गावातून नामदेव जवळच्या घुमान गावात आले. अमृतसरजवळच्या गुरुदासपूर जिल्ह्यातलं घुमान हे काही गाव नव्हते तर ते एक जंगल होते. नामदेव महाराज घुमत घुमत म्हणजे देशभर फिरत इथे आले आणि स्थिरावले म्हणून ‘घुमान’ असे म्हटले जाते. घुमान आडनावाचे भक्त इथे त्यांच्या सेवेसाठी राहत होते म्हणून ‘घुमान’ नाव असल्याचे या गावाच्या ,उत्पत्तीबद्दल सांगितले जाते.

घुमानमध्ये नामदेव महाराज कीर्तन-भजन करत. त्यांचे भजन ऐकून लोक भेटण्यासाठी येत. यासाठी त्यांनी पंजाबी भाषा आत्मसात केली होती. यामुळे नामदेवांच्या उपदेशाने अनेकांना आयुष्याचा मार्ग सापडला. लोकांमध्ये नामदेव महाराजांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. या प्रवचनांमधून आणि किर्तनांमधून त्यांनी गावातील अनेक वाईट चालीरिती, व्यसने याविषयी लोकांचं प्रबोधन केले. शीख लोक संत नामदेव महाराजांना ‘भगत नामदेव’ अशी हाक देतात, बाबा नामदेव किंवा नुसतंच बाबाजी…अशा नावांनी पंजाबी माणूस संत नामदेवांना हाक मारत असतो. त्यामुळे संत नामदेव महाराजांमुळे शेकडो वर्षांपासून या गावाची नाळ महाराष्ट्रासोबत जोडली गेली आहे.

विठ्ठल भक्तीमध्ये तल्लीन होत वीणा वाजवत कीर्तन करणारे संत नामदेव महाराज असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते. पण पंजाबमध्ये नामदेव महाराजांचे रूप काहीसे वेगळे आहे. दाढी, डोक्यावर केसांचा बुचडा, हातात जपमाळ घेतलेले नांदेव महाराज येथे बघायला मिळतात. संपूर्ण पंजाबमध्ये नामदेव याच रुपात भेटतात. इतकेलच नाही तर घुमान गावातल्या प्रत्येक दुकानात आणि प्रत्येक घरात आजही बाबा नामदेवांची हीच प्रतिमा बघायला मिळते.

मोहम्मद तुघलक याच्या काळात त्याच्या अत्याचाराच्या विरोधात नामदेव महाराजांनी जनजागृती केली. तुघलकाच्या लोकांनी नामदेवांना त्रासही दिला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुघलक याचा नातू फिरोज याने ही समाधी बांधल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर/ गुरुद्वारा सन १७७० मध्ये सरदार जस्सासिंह राम-दिया यांनी बांधल्याचा / नूतनीकरण केल्याचा संदर्भ लेखक भाईसाहब कानसिंह नाथा यांनी त्यांच्या कोशात दिला आहे. शीख धर्मात दहा गुरूंप्रमाणेच प्रातःस्मरणीय असणाऱ्या १५ भगवतांमध्ये नामदेवांना ‘भगत शिरोमणी’ म्हणून ओळखले जाते.

आज अनेक वर्षानंतरही पंजाबी मनात असलेले त्यांचे स्थान फार मोठे आहे.मराठीप्रमाणेच नामदेवांनी हिंदी भाषेतदेखील अभंगरचना केली आहे. त्यांच्या सुमारे १२५ हिंदी अभंग रचना आहेत . यांपैकी ६१ पदे शिखांच्या ‘ग्रंथसाहिब‘ या पवित्र ग्रंथात अंतर्भूत करण्यात आली असून ती ‘नामदेवजी की मुखबानी’ या नावाने ओळखली जातात. नामदेव महाराजांनी अनेक भाषा आत्मसात केल्या. पंजाबात त्यांचे सुमारे वीस वर्षे वास्तव्य होते. नामदेव हे दीर्घायुष ठरले. वयाच्या ८१ व्या वर्षी म्हणजे शके १२७२ मध्ये म्हणजे ३ जुलै, १३५० रोजी ते इहलोकी गेले.

Exit mobile version