आजपासून संस्कृत भाषा सप्ताहाला सुरुवात होत आहे. १९ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट या कालावधीत हा सप्ताह साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देववाणी अर्थात देवांची भाषा म्हणून संस्कृत भाषा प्रसिद्ध आहे. संस्कृत भाषेला जगभरातील अनेक भाषांची जननी म्हटले जाते. दुर्दैवाने आज संस्कृत ही दैनंदिन व्यवहारातील भाषा उरलेली नाही. पण याचा अर्थ त्याचे महत्त्व कमी झाले असा होत नाही. आजही भारतभरात संस्कृत भाषा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. विविध शाळांमध्ये या सप्ताहाच्या निमित्ताने उपक्रम राबवले जात आहेत.
हे ही वाचा:
शिवसेनेचे नारायण राणेंविरोधात सुडाचे राजकारण
राज्यातील नराधमांना आळा घालायला ठाकरे सरकार अपयशी
आता हिंदू धर्माविषयी शिका आणि पदवी मिळवा
नुसती माणसेच नाही तर श्वानही सुखरूप परत आणले
संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार आणि संवर्धन या दृष्टीने हा संस्कृत भाषा सप्ताह फारच महत्त्वाचा मानला जातो. श्रावणी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधनाचा दिवस मध्यबिंदू मानून त्याच्या आधीचे तीन दिवस आणि नंतरचे तीन दिवस अशा सात दिवसांची निवड करून हा संस्कृत भाषा सप्ताह साजरा केला जातो.
या संस्कृत सप्ताहाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘संस्कृत ही इतकी समृद्ध भाषा आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूला ती स्पर्श करते.’ असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. संस्कृत भाषेची लोकप्रियता जगभर आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे संस्कृत भाषा की अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद असल्याचे मोदी म्हणाले. तर संस्कृत भाषा सप्ताहाच्या निमित्ताने नागरिकांमध्ये भाषेविषयी रस आणि उत्साह निर्माण होईल याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.