रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

रामनवमीच्या गदारोळानंतर जेएनयूमध्ये फडकले भगवे झेंडे

रामनवमीच्या दिवशी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी (जेएनयू) मध्ये झालेला वाद अद्याप संपला नाही. आता, जेएनयूच्या बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य गेटजवळ ‘भगवा JNU’ लिहिलेले फलक लागले आहेत. हे फलक हिंदू सेनेने लावल्याचे सांगण्यात येत आहे.

हिंदू सेनेने शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुख्य गेटवर भगवे ध्वज लावले. संघटनेने  कॅम्पसभोवती फलक चिकटवले होते, ज्यावर “भगवा जेएनयू” लिहिले होते. याबाबत हिंदू सेनेचे उपाध्यक्ष सुरजित यादव म्हणाले की, जेएनयूमध्ये विरोधकांनी भगव्याचा अपमान केला. त्यामुळे विद्यापीठाच्या इथे आम्ही भगवे झेंडे लावले. भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमचा आदर करतो. भगव्याचा अपमान हिंदू सेना सहन करणार नसल्याचे यादव म्हणाले आहेत. काही वेळातच पोलिसांनी ते झेंडे काढले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाईही सुरू केली आहे.

जेएनयू प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली असून या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कारवाईचा इशारा देखील दिला आहे. विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. पोलीस उपायुक्त दक्षिण पश्चिम मनोज सी. यांनी सांगितले की, जेएनयूच्या आजूबाजूला आज काही झेंडे आणि फलक रस्त्यावर लावण्यात आल्याचे लक्षात आले. त्यांनतर ते त्वरित  काढून टाकण्यात आले आहेत याबाबत कायदेशीर कारवाई केली जात आहे.”

दरम्यान, रामनवमीच्या दिवशी जेएनयूच्या ‘कावेरी’ वसतिगृहाच्या मेसमध्ये मांसाहार देण्यावरून दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही बाजूचे विद्यार्थी जखमी झाले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचाऱ्यांना मांसाहार बनण्यापासून रोखले आणि तिथे उपस्थित विद्यार्थ्यांवर हल्ला केला, असे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात किमान १६ विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Exit mobile version