ग्राहकांच्या वर्दळीवाचून ओस झालेली बाजारपेठ गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी गजबजून गेली. दादर, लालबाग, फोर्ट परिसरातील बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली. दुपारनंतर गर्दी अधिक वाढली. लोकल प्रवासास बंदी असल्याने वैयक्तिक वाहने घेऊन नागरिक खरेदीसाठी आले होते. परिणामी सायंकाळी चारच्या सुमारास दादरमध्ये प्रचंड वाहतूककोंडी झाली.
हीच अवस्था लालबागसह मुंबईतील स्थानिक बाजारपेठांची होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोना निर्बंधांना केराची टोपली दाखवत बाजारांमध्ये पुन्हा एकदा गर्दी दिसू लागलेली आहे. निर्बंधांना केराची टोपली आणि मास्क न वापरणे असे चित्र सर्रास दिसत आहे. बाजारांप्रमाणेच सर्व रस्तेही ओसंडून वाहात आहेत.
गणेश चित्रशाळांभोवती ट्रक, टेम्पो, खासगी गाड्या, बैलगाड्या, हातगाड्यांची रांग आणि उत्साही गणेशभक्तांची उपस्थिती हे चित्र पाहायला मिळत होते. छोट्या वाहनांमधूनही गणपतीबाप्पाचा गजर ऐकू येत होता. लालबाग, परळमध्ये तर प्रत्येक गल्लीत, रस्त्यांवर गणरायाच्या मोठ्या मूर्तींचे दर्शन होत होते. यामुळे या भागातील वाहतुकीची गतीही मंदावली होती.
मुंबईतील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त होत असतानाही गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला मुंबईतील प्रमुख बाजारपेठांत गर्दीला उधाण आले होते. उत्सवादरम्यान गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस-पालिका उपाययोजना करत असताना बाजारांत मात्र, पूजा साहित्य तसेच अन्य वस्तूंच्या खरेदीकरिता नागरिकांची झुंबड उडाली होती. या ठिकाणी करोना नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी ग्राहक, दुकानदार यांनी मुखपट्टी परिधान केली नसल्याचेही दिसून आले.
हे ही वाचा:
सापडले १५०० वर्षापूर्वीचे गुप्त काळातील मंदिराचे अवशेष
दर्शनाचा लाभ घ्यावा ऑनलाइन असा…
साकीनाक्यात ‘निर्भया’च्या पुनरावृत्तीने खळबळ
उत्तराखंडमधील छोट्याशा खेड्यात प्रत्येक घरात एक निकिता…
एकच दिवस कमाईचा असल्याने विक्रेत्यांनी रस्त्यावरही दुकाने थाटली होती. गणपतीचे शेले, कंठय़ा, दागिने, गृहसजावटीच्या वस्तू, रांगोळ्या, शोभेची फुले, प्रसाद, पूजेचे साहित्य, फुले-फळे यांनी रास्ते व्यापून गेले होते. ग्राहकांची विक्रेत्याबरोबर चालणारी घासाघीस, गणेशाच्या येण्याची आतुरता, मनासारखी विक्री होत असल्याने विक्रे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान यामुळे बाजारपेठेत उत्सवी वातावरण होते.