गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना तो साधेपणाने साजरा करण्यासाठी पालिकेने घरगुती आणि सार्वजनिक गणेश मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या वर्षीही अनेक निर्बंध कायम ठेवले आहेत. लसीच्या दोन मात्रांचा नियम यावेळी नियमावलीत नव्याने उल्लेख केला आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या कार्यकर्त्यांना मंडळाने प्राधान्य द्यावे, अशी अट नियमावलीत ठेवण्यात आली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता यंदाच्या वर्षी सार्वजनिक मंडळांना अनेक नियम पाळावे लागणार आहेत. पालिकेने गेल्या वर्षी सार्वजनिक मंडळांना लागू केलेले नियम यंदाही लागू केले आहेत आणि काही नव्या नियमांची भर त्यात केली आहे. सार्वजनिक मंडळांना आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंडळातील मूर्तींचे प्रत्यक्षदर्शन व मुखदर्शनास सक्त मनाई करण्यात आली आहे. मंडळांनी ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक याद्वारे दर्शनाची व्यवस्था करावी, असा नियम घालण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती आगमन व विसर्जनाच्या वेळी १० पेक्षा अधिक कार्यकर्ते असू नयेत आणि लसीचे दोन डोस घेतलेल्यांना प्राधान्य द्यावे. विसर्जनाच्या वेळी वाहन धीम्या गतीने चालवू नेऊ नये, अशी नवीन अट घालण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये शरिया कायदा लागू होणार
संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केले, आता होणार तालिबानचे मंत्री
शिवसेनेला मराठी माणसाचा एवढा आकस का?
आधी आरोग्य मंदिरं उघडतील, मंदिरे नंतरच!
सार्वजनिक गणेश मूर्ती आणि घरगुती मूर्तींच्या उंचीवरही बंधने घालण्यात आली आहेत. त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टीचा वापर आणि सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक असेल, घरगुती गणेश मूर्तींचे आगमन मिरवणूक स्वरूपाचे नसावे, जास्तीत जास्त पाच व्यक्तींचा समूह असावा, या व्यक्तींनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, घरगुती मूर्ती संगमरवराची किंवा धातूची असावी आणि तिचे विसर्जन प्रतीकात्मक करावे, शाडूची मूर्ती असल्यास घरच्या घरी विसर्जन करावे किंवा कृत्रिम तलावावर विसर्जन करावे, विसर्जन मिरवणुका काढू नयेत, चाळीतील किंवा इमारतीतील गणेश मूर्ती एकत्र विसर्जनासाठी नेऊ नयेत, विसर्जनाच्या वेळी केली जाणारी आरती आणि पूजा घरीच करावी, असे नियम नियमावलीत आहेत.
मंगळवारपर्यंत पालिकेकडे २,३९६ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी १,६७१ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे; तर ४४० अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. २८१ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी यंदा पालिकेने कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. यावर्षी १७३ ठिकाणी कृत्रिम तालव निर्माण करण्यात आले असून ७३ ठिकाणी नैसर्गिक विसर्जनस्थळे आहेत. तसेच काही विभागांतर्गत मूर्ती संकलन केंद्रेही स्थापन करण्यात आली आहेत.