माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी १२वीच्या पुस्तकात औरंगजेबाने मंदिरांच्या दुरूस्तीसाठी मदत दिली असा मजकूर कुठल्याही पुराव्याशिवाय छापल्याप्रकरणी एनसीईआरटीला कायदेशीर नोटिस पाठवली आहे. त्याबरोबरच या पुस्तकात आवश्यक ते बदल करण्याची मागणी देखील केली आहे.
कोणत्याही प्रकारचा पुरावा उपलब्ध नसताना एनसीईआरटीच्या पुस्तकात शहाजहान आणि औरंगजेब यांनी हिंदु मंदिरांच्या दुरूस्तीसाठी मदत केली असल्याचा उल्लेख करून या दोन्ही बादशहांना थोर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते भारतपूर दपिंदर सिंग यांनी या विरोधात आवाज उठवून पुस्ताक आवश्यक ते बदल करण्याची मागणी केली आहे. ‘इतिहासाच्या पुस्तकात देण्यात येणारी माहिती सत्य असली पाहिजे. जर देण्यात आलेली माहिती पुराव्यांवर आधारित नसेल, तर ते इतिहासाचे विकृतीकरण आहे.’ असे देखील त्यांना वाटते.
मुघल बादशहांनी मंदिरांच्या दुरूस्तीसाठी मदत केल्याचे पुस्तकात लिहीले होते, त्यावर जानेवारी महिन्यात माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज दाखल करण्यात आला होता. इतिहासाच्या पुस्तकातील पान क्र. २३४ वर म्हटले होते की, ‘सर्व मुघल बादशहांनी धार्मिक स्थळांच्या बांधणीसाठी आणि देखभालीसाठी पैसे दिले. जी मंदिरे युद्धात नष्ट केली गेली ती देखील पुन्हा बांधून काढण्यासाठी पैसे देण्यात आले- आपल्याला शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कारकिर्दीत हे आढळून येते .’(मुळ इंग्रजी मजकुराचा स्वैरानुवाद)
यावर याचिकाकर्त्यांने दोन गोष्टींची माहिती मागवली होती. पहिले, ज्या स्रोतावरून मुघलांनी शहाजहान आणि औरंगजेब यांच्या कारकीर्दीत युद्धात नष्ट झालेली मंदिरे पुन्हा बांधायला मदत केली तो स्रोत आणि दुसरा, शहाजहान आणि औरंगजेब यांनी दुरूस्त केलेल्या मंदिरांची संख्या. मात्र दोन्ही बाबत एनसीईआरटीने ‘या संदर्भातली माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले’. हे उत्तर माहिती अधिकारी आणि सामाजिक विज्ञान विभागाच्या प्रमुख प्रोफेसर गौरी श्रीवास्तव यांनी दिले आहे.