राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठेशी संबंधित पूजेच्या पाचव्या दिवशी रामलल्लाची नवी मूर्ती आणि चांदीच्या मूर्तीचा ११० किलो फळाफुलांनी अभिषेक करण्यात आला. गर्भगृहातील दोन्ही मूर्तींना फळाफुलांनी आच्छादित करण्यात आले. सुमारे ६० किलो फुलांच्या झालेल्या पुष्पाभिषेकामध्ये कमळ, गुलाब, जुई आणि शेवंतीच्या फुलांचा समावेश होता. कमळाची फुले बिहार, शेवंतीची फुले तमिळनाडू आणि जुईची फुले कोलकाताहून मागवण्यात आली होती. ५० किलो फळांच्या अभिषेकात संत्रे, केळ, सफरचंद, डाळींब आणि पेरूचा समावेश होता. ८१ कलश पाण्याने मंदिर शुद्ध केले गेले. कलशात औषधी वनस्पती आणि तीर्थक्षेत्रांचे पाणी, झाडाची पाने, पंचरत्न आणि नवरत्न होते. या दरम्यान संपूर्ण रामनगरात दिव्यांचा झगमगाट होता. सगळीकडे रामधून वाजत होती.
शनिवारी झालेल्या वास्तूपूजेत १२१ पुजारी-आचार्य सहभागी झाले होते. सकाळी प्रभू श्रीरामाच्या चांदीच्या मूर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. पं. अनिल दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक अभिषेकानंतर देवाला परिसरात फिरवले जाते. चार अभिषेकानंतर शनिवारी चारवेळा परिक्रमा करण्यात आली. शुक्रवारी नवग्रहांचे हवन झाले होते. शनिवारी प्रभू रामाच्या मंत्रांसह हवन झाले. प्रत्येक कुंडात एक हजार आठ आहुत्या दिल्या गेल्या. मंदिरात रामायण आणि वेदांचे पठण झाले. प्रत्येक दिवशी आठ तास पठण होत आहे. तर, सोमवारी प्राणप्रतिष्ठेचा मुख्य कार्यक्रम होईल.
हे ही वाचा:
घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणार
नाना, मग सोनियांना पाठवा ना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला
‘मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा
पालखीला खांद्यावर घेण्यासाठी उत्साह
जय श्रीरामाचा उद्घोष आणि खांद्यावर रामलल्लाची चांदीची मूर्ती असणारी पालखी… असे दृश्य अयोध्येत दिसत होते. जवळचे आचार्य आणि पुजारी तल्लीन झाले होते. प्रत्येक जण पालखीला खांद्यावर घेण्यासाठी उत्सुक होता.
काशीच्या डोमराजासह १५ यजमान
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात काशीच्या डोमराजासह विविध वर्गांचे १५ यजमान सपत्नीक सहभागी होणार आहेत. श्रीरामाच्या दरबारात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिणेला समाजातील प्रत्येक वर्गाचे प्रतिनिधीत्व असेल, याची काळजी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने घेतली आहे.
पंतप्रधान मोदी चार तास राहणार
पंतप्रधान मोदी सोमवारी चार तास अयोध्येत असतील. ते सकाळी १०.२५ मिनिटांनी अयोध्या विमानतळ आणि १०.५५ मिनिटांनी रामजन्मभूमीवर पोहोचतील. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर ते एक वाजता सभेला संबोधित करतील. तर, दोन वाजून १० मिनिटांनी कुबेर टेकडीवरील शंकराचे दर्शन घेऊन ते दिल्लीला परत जातील.