उत्तर प्रदेशातील २४० मदरशांची मान्यता लवकरच रद्द केली जाणार आहे. जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेश मदरसा शिक्षा परिषदेला ही यादी पाठवली आहे. यातील बहुतांश मदरसे नीट कार्यरत नसल्याचे समजते. तर, अनेक मदरशांमध्ये निर्धारित संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असल्याने ‘यू-डायस’वर त्यांची कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. काही मदरशांनी तर स्वत:हूनच बोर्डाकडे मान्यता रद्द करावी, अशी विनंती केली आहे.
उत्तर प्रदेशातील बोर्डाशी संलग्न पहिली ते पाचवी, पाचवी ते आठवी आणि हायस्कूल व त्याहून उच्च शिक्षण देणारे सुमारे १६ हजार ४५० मदरसे मान्यताप्राप्त आहेत. त्यातील सुमारे ५६० मदरशांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र मदरसा बोर्डच्या परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींची संख्या दरवर्षी घटते आहे. या वर्षी उत्तर प्रदेशातील मदरशांमधून केवळ एक लाख ७२ हजार अर्ज आले होते. मदरसा बोर्डाचे नवे नियम याला कारणीभूत मानले जात आहेत. या अंतर्गत अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ‘आलिम’साठी अर्ज करताना हायस्कूल आणि ‘कामिल’मध्ये अर्ज करण्यासाठी इंटमीडिएट किंवा समकक्ष परीक्षेमध्ये उर्दू, अरबी, फारसी भाषेमध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा:
‘मत्स्य ६०००’ च्या साथीने भारत समुद्राच्या उदरातील रहस्य उलगडणार
जी-२०च्या यशस्वी आयोजनाबद्दल भारताचे जगभरातून कौतुक
मरीन ड्राईव्हला फिरायला निघालेल्या मित्रांच्या मोटारीला अपघात, दोन भाऊ ठार
सत्तेत बसलेले लबाड, बेईमान नाहीत; संभाजी भिडेंनी जरांगे पाटलांना दिला विश्वास
मऊच्या १० मदरशांनी मान्यता रद्द करण्यासाठी पत्र पाठवले असल्याची माहिती मदरसा बोर्डाच्या रजिस्ट्रार डॉ. प्रियांका अवस्थी यांनी दिली. आंबेडकरनगरमधील २०४ मदरसे चालत नाहीत. तर, लखनऊमधील चार मदरशांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. या यादीत अमरोहा आणि संत कबीरनगरमधील मदरशांचाही समावेश आहे.
मदरशाच्या नियमावलीनुसार, ‘तहतानिया’पासून ते ‘मुन्शी मौलवी’पर्यंतच्या मान्यतेसाठी मदरशामध्ये किमान १५० विद्यार्थी असणे आवश्यक आहे. यात मुंशी-मौलवीमध्ये ३०हून कमी विद्यार्थी असता कामा नये. तर, आलिम, कामिल आणि फाजिलच्या मान्यतेसाठी किमान १० विद्यार्थी मदरशात शिकणे अनिवार्य आहे.