श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी असल्याने त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते, असा आरोप काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी केला होता. यावर तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपत राय यांनी आक्षेप घेतला आहे.
‘राहुल गांधी यांची वक्तव्ये पूर्णपणे असत्य, निराधार व भ्रामक आहेत. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अन्य मागास वर्गाशी संबंधित संत, महापुरुष, गृहस्थ आणि विविध क्षेत्रांत यश मिळवणाऱ्या, भारताचा गौरव वाढवणाऱ्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. मंदिरासाठी काम करणारे श्रमिक कार्यक्रमात आमंत्रित होते.
हे ही वाचा:
संपत्ती पुनर्वाटपाचे विचार बाळबोध आणि अज्ञानीपणाचे!
आघाडीची फळी कोलमडल्यामुळे पराभव, हार्दिक पांड्याची टीका!
भक्तांकडून दक्षिणा घेतल्याने तमिळनाडू पोलिसांकडून चार पुजाऱ्यांना अटक
दिल्ली, नोएडातील ५० हून अधिक शाळांना बॉम्बची धमकी!
अल्पसंख्याकांनाही आमंत्रण देण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधीला मंदिराच्या गर्भगृहात अनुसूचित जाती, जमाती व मागास वर्गातील व्यक्तींना पूजा करण्याची संधी मिळाली,’ असे चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे. ‘तीन महिन्यांपूर्वी झालेल्या कार्यक्रमाबाबत तथ्य जाणून न घेता असत्य, निराधार व भ्रामक भाषणामुळे समाजात भेदभाव निर्माण होऊ शकतो. भाषणातील या भागावर आमचा तीव्र आक्षेप आहे. जिथे प्रभू श्रीरामाने आपल्या जीवनकाळात समाजाच्या कोणत्याही जातीधर्माच्या प्रति भेदभाव ठेवला नाही, तिथे श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी झटणारे श्रीराम मंदिर ट्रस्ट कोणत्याही प्रकारे भेदभाव करू शकत नाही,’ असेही राय यांनी स्पष्ट केले.