राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथक परिश्रमाचं राज ठाकरेंकडून कौतुक

ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अथक परिश्रमाचं राज ठाकरेंकडून कौतुक

Raj Thackeray appreciates the tireless work of Rashtriya Swayamsevak Sangh

देशात हिंदुत्वाची ज्योत अखंडपणे तेवत ठेवणाऱ्या संघटनांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अग्रणी संघटन आहे. विजयादशमी १९२५ मध्ये पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुसंघटित सामर्थ्यशाली हिंदू समाजाचं बघितलेलं स्वप्न काही अंशी सत्य झालं आहे. हे करत असताना संघ समाजातल्या सर्व स्तरांतील घटकांना घेऊन समाजाची बांधणी करत आला आहे. अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आज विजयादशमीनंतर शंभराव्या वर्षांत पदार्पण केलं आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक, अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक केलं आहे.

आपल्या एक्स अकाउंट वरून ट्विट करत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शुभेच्छा दिल्या. सोबतच त्यांनि स्वयंसेवक, प्रचारक आणि कार्यकर्त्यांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. मनसे नेते राज ठाकरे यांचं ट्विट पुढीलप्रमाणे,

“आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वर्धापनदिन. ९९ वर्ष पूर्ण करत शंभरीत या संघटनेने पदार्पण केलं. याबद्दल प्रत्येक संघ स्वयंसेवकाचं मनापासून अभिनंदन.

भारताला आपली मातृभूमी मानणारे सगळे हिंदू आहेत आणि या हिंदू समाजाचे एकत्रीकरण हे उद्दिष्ट घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली.
भारतीयत्व, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व याचा अभिमान समाजामध्ये व्हावा यासाठी गेली ९९ वर्ष संघाने निःसंशय मोठं काम केलं आहे.

संघाचं काम मला कायमच अचंबित करतं. देशात कोणीतही नैसर्गिक आपत्ती आली तर तिथे तात्काळ धावून जाण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रेसर असतो, हे मी अनेकदा पाहिलं आहे.

संघातील बर्‍याच स्वयंसेवक व प्रचारकांशी माझा संवाद आहे. देशाच्या दुर्गम भागांमध्ये जाऊन काम करणं, तिथे भारतीयत्वाची, राष्ट्रीयत्वाची भावना रुजवणं, यांसाठी त्यांना किती संघर्ष करावा लागतो याचा तपशील मला माहित आहे.

मुळात एका विचाराला घट्ट धरून ठेवत, एखाद्या संघटनेने १०० वर्ष काम करावं हे सोपं नाही. जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना १०० वर्ष टिकली असेल आणि तरीही तिचा विस्तार सुरु असेल आणि ती कार्यशील असेल.

ही संघटना कायम जागृत ठेवणाऱ्या सर्व संघ स्वयंसेवकांना माझ्या अतिशय मनापासून शुभेच्छा. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व रुजवण्यासाठी धडपडणारा प्रत्येक घटक, विचार हा असाच तेवत राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

-राज ठाकरे”

राज ठाकरेंच्या शुभेच्छा नंतर सोशल मीडियावर मोठ्या संख्येने प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संघ स्वयंसेवक/कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. सोबतच ‘राज्यात मतभेद आणि मनभेद यांतील अंतर समजलेले नेते’ म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

Exit mobile version