भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भव्य राम मंदिर निर्माणासाठी ५ लाख १०० रुपयांचा धनादेश दिला आहे. अयोध्येत रामजन्मभूमीच्या जागी प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी निधी संकलनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला १५ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या देणगीने या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. या कार्यक्रमा अंतर्गतच राष्ट्रपती कोविंद यांच्याकडूनही निधी स्विकारण्यात आला.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे उपाध्यक्ष गोविंददेव गिरीजी महाराज यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार, मंदिर निर्माण समितीचे न्रिपेंद्र मिश्रा आणि रा.स्व.संघाचे कुलभूषण अहुजा हे देखील होते. राष्ट्रपती कोविंद यांनी या समितीकडे ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. “राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे देशाचे पहिले नागरिक आहेत. त्यामुळे आम्ही निधी संकलनाचा शुभारंभ केला” असे विहिंपच्या अलोक कुमार यांनी सांगितले.
१५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत देशात भव्य राम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन होणार आहे. ‘राम मंदिर निर्माण से राष्ट्र निर्माण’ या कार्यक्रमांतर्गत साडेचार लाख गावातील ११ कोटी परिवारांपर्यंत जाऊन निधी संकलन केले जाणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील ५० ते ६० कोटी रामभक्तांशी संपर्क साधला जाणार आहे.