साध्वी सरस्वतीजी यांनी सांगितले आंदोलनाचे महत्त्व
अयोध्येतील श्री राममंदिरासाठी देशभरात झालेले आंदोलन हे या देशाच्या अस्मितेला जागविण्यासाठी केलेला अखंड यज्ञ होता. या आंदोलनामुळे देशाचे भाग्यच बदलून गेले, अशा शब्दांत सनातन धर्म प्रचार समितीच्या अध्यक्ष व प्रवचनकार साध्वी सरस्वतीजी यांनी या देशाचे चित्र बदलणाऱ्या आंदोलनाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रसिद्ध उद्योगपती आणि कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि त्यांच्या पत्नी तसेच कारुळकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष शीतल कारुळकर यांनी ठाणे येथील एका फार्महाऊसवर साध्वी सरस्वतीजी आणि मंहत आदित्य कृष्ण गिरी यांची सदिच्छा भेट घेतली. तेव्हा कारुळकर यांनी राममंदिराची एक अत्यंत सुबक अशी क्रिस्टल प्रतिमा साध्वीजी आणि मंहतजी यांना भेट दिली. त्यांनी ही प्रतिमा आपल्याला प्रचंड भावल्याचे सांगताना श्रीराम मंदिरासाठी देशभरात करण्यात आलेल्या आंदोलनाचे महत्त्व विषद केले.
अयोध्येत आता श्रीराम मंदिराची वेगाने उभारणी होत आहे.
कारुळकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रशांत कारुळकर यांनी आदिवासी क्षेत्रात केलेल्या कार्याचेही साध्वीजींनी कौतुक केले. साध्वीजींचे ठाण्यात प्रवचन होते त्यानिमित्त त्यांचे आगमन झाले होते. महंत आदित्य कृष्णगिरी हे आंतरराष्ट्रीय हिंदू सेनेचे प्रमुख आहेत.
हे ही वाचा:
दुसऱ्या कसोटीत किवींवर भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व
AK-203 रायफल्स बनवणाऱ्या प्रकल्पाला केंद्राची मंजुरी
महाराज आदित्य कृष्ण गिरी यांनी कारुळकर प्रतिष्ठानच्या कार्यालयाला भेट देऊन कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि त्यांची पत्नी व प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा शीतल कारुळकर यांना आशीर्वादही दिले. प्रशांत आणि शीतल कारुळकर यांनी मंहत आदित्य कृष्ण गिरी तसेच साध्वी सरस्वतीजी यांना यावेळी शाल अर्पण करून त्यांचा सन्मान केला.
महंत आणि साध्वीजी यांच्यासोबत काही काळ व्यतित करता आला, हे आपले भाग्य असल्याचे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याचे प्रशांत कारुळकर यांनी सांगितले.